मुंबई – राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून आता नियम तपासून त्यांना बडतर्फ केले जाईल तसेच कुरुंदकर यांना देण्यात आलेले राष्ट्रपतीपदक परत घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानपरिषदेत दिले.
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले, की १४ जुलै २०१७ रोजी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणी अभय कुरुंदकर आणि त्यांचे साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांनी आधी अश्विनी बिद्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते वाशी खाडीत टाकले. नौदलाच्या सहाय्याने मृतदेह किंवा त्यासंबंधीचे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.
बिद्रे यांच्या राहत्या घरातून विविध प्रकारचे पुरावे जमा करण्यात आले असून त्यांची न्यायवैद्यक चाचणी सुरू आहे. याप्रकरणी ३१ जानेवारी २०१७ ला कुरुंदकर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर, त्यानंतर जवळपास ११ महिन्यानंतर ७ डिसेंबर २०१७ ला अटक करण्यात आली. त्यानंतर आठ दिवसांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले. यावर सदस्यांनी कुरुंदकरच्या बडतर्फीची आणि राष्ट्रपतीपदक मागे घेण्याची मागणी केली असता यावर, नियम तपासून कुरूंदकर यांना बडतर्फ करण्यात येईल. तसेच, राष्ट्रपतीपदक मागे घेण्याबाबत शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल, असेही आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.