भुसावळ । येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवार 14 रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे सुनिल महाजन व उपसभापतीपदी मनिषा पाटील या विजयी झाल्या. पंचायत समितीत भाजपाचे संख्याबळ अधिक असताना देखील निवडणूक बिनविरोध होऊ नये याकरीता विरोधकांकडून अडचणी निर्माण करण्यात आल्या. एकूण सहा सदस्यापैकी चार सदस्य हे भाजपाचे निवडून आले होते. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य असल्यामुळे भाजपाचे बहुमत असताना देखील विरोधकांकडून नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेस दुपारी 11 वाजता सुरुवात झाली. यावेळी कुर्हे गणातून भांजपाचे विजयी झालेले सुनिल श्रीधर महाजन यांनी सभापती पदासाठी तर उपसभापती पदासाठी वराडसीम गणातील मनिषा भालचंद्र पाटील यांनी नामांकन अर्ज दाखल केले. मात्र हि निवडणूक बिनविरेाध न होण्यासाठी विरोधकांकडून अडथळा निर्माण करण्यात आला यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आशा निसाळकर यांनी सभापती पदासाठी तर शिवसेनेचे विजय सुरवाडे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. मात्र भाजपाचे दोन्ही उमेदवार प्रत्येकी चार मते मिळून विजयी झाले. तर विरेाधी उमेदवारांना प्रत्येकी दोन मते मिळाली. निकाल जाहीर होताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती बाहेर फटाके फोडून जल्लोष केला.
असे झाले निवडणूक प्रक्रियेचे कामकाज
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर होते. त्यांना गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांनी सहकार्य केले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास पंचायत समिती सभागृहात आलेल्या अर्जांची छाणणी करण्यात आली. यामध्ये सभापती पदासाठी कुर्हे पानाचे गणातून विजयी झालेले भाजपा उमेदवार सुनिल महाजन यांना प्रिती मुकेश पाटील या सुचक होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आशा निसाळकर यांना विजय सुरवाडे हे सुचक होते.
चार मतांनी मिळाला विजय
उपसभापती पदासाठी भाजपा उमेदवार मनिषा पाटील यांना वंदना उन्हाळे यांनी तर शिवसेना उमेदवार विजय सुरवाडे यांना आशा निसाळकर या सुचक होत्या. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अर्जांची छाणणी करुन चारही अर्ज वैध ठरविले. यानंतर पक्षांतर बंदी असल्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या आशा निसाळकर व शिवसेनेचे विजय सुरवाडे यांना प्रत्येकी दोन मते मिळाली तर भाजपा उमेदवार सुनिल महाजन व मनिषा पाटील यांना चार मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चिंचकर यांनी जाहीर केले.
दगाबाजी केल्याने हुकले सभापतीपद
पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी मावळते उपसभापती गोलू पाटील यांच्या पत्नी प्रिती पाटील या देखील इच्छूक होत्या. मात्र साकेगाव – कंडारी गटात भाजपा उमेदवाराच्या विरोधात काम केल्यामुळे याठिकाणी पराभव झाला होता. त्यामुळे सभापती पदासाठी गोलू पाटील यांना नाकारण्यात आले.
सभापती चौधरींची फळी फेकली
मावळते सभापती राजेंद्र चौधरी यांनी भाजपा उमेदवारांविरुध्द काम केले तसेच दालनातील आमदार सावकारे यांची प्रतिमा काढली होती. याचा संताप म्हणून आज नवनिर्वाचित सभापती सुनिल महाजन हे सभापती दालनात गेले असता काही कार्यकर्त्यांनी चौधरींच्या नावाची फळी काढून फेकली.
निवडणूकीत सहभागाबद्दल हरकत
शिवसेनेचे विजय सुरवाडे यांनी भाजपाच्या सदस्या प्रिती पाटील यांच्यावर आक्षेप नोंदविला. प्रिती पाटील या खडका येथील सरपंच असून पंचायत समिती सदस्या म्हणून निवडून आल्यानंतर सात दिवसांच्या आत सरपंच पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. मात्र त्यांनी राजीनामा दिला नसल्याने त्या मतदानात भाग घेवू शकत नसल्याची हरकत सुरवाडे यांनी नोंदविली असता प्रिती पाटील यांनी आपण सभापतींकडे राजीनामा सुपूर्द केला असून तो प्रक्रियेत असल्याचे लेखी स्वरुपात लिहून दिले आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी पंचायत समिती कार्यालयात येऊन नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनिल नेवे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्णयक्ष पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकुर, राजेंद्र आवटे, विक्की बत्रा, गोलु पाटील, नारायण कोळी, समाधान पवार, उल्हास बोरोले, बंटी कोल्हे, दिनेश नेमाडे, राजेंद्र साहेबराव चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.