आळंदी : येथील आळंदी देवाची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 14) उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास 27 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आळंदी व केळगावातील गावपुढार्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांची मनधरणी सुरू आहे. बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना यश आले नाही तर, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
एक जागा बिनविरोध
आळंदी देवाची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 13 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 13 जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरित 12 जागांसाठी विहीत मुदतीत 31 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत त्यातील दोन अर्ज बाद झाले. त्यामुळे सध्या 12 जागांसाठी एकूण 29 अर्ज वैध ठरले आहेत. आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी राहुल चिताळकर पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी निवड बिनविरोध मानली जात आहे.
16 रोजी चिन्हवाटप
आळंदी व केळगाव या दोन गावांसाठी आळंदी विकास सोसायटी कार्यरत आहे. या दोन्ही गावातील शेतकरी या सोसायटीचे सभासद आहेत. 2017-18 ते 2021-22 या पंचवार्षिक कालावधीसाठी सदस्यांची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर 16 ऑगस्टला रिंगणातील उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात येणार आहे. सोमवारी अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत असल्याने कोण-कोण माघार घेते, याकडे लक्ष लागले आहे. बिनविरोध निवडीचे प्रयत्न फसले तर, 27 ऑगस्टला येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी करून निकाल जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांनी दिली.
सर्वसाधारण खातेदारसाठी सर्वाधिक अर्ज
सर्वसाधारण खातेदारसाठी (कर्जदार) आठ जागा असून, त्यासाठी 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, माजी नगरसेवक संभाजी कुर्हाडे, माजी सरपंच नंदकुमार मुंगसे, सोमनाथ मुंगसे, वासुदेव मुंगसे, उत्तम भोसले, ज्ञानोबा वहिले, शिवाजी मुंगसे, रोहिदास मुंगसे, दिलीप गुलाब कुर्हाडे, माजी चेअरमन ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्धन घुंडरे, शशिकांत घुंडरे, दिलीप तुकाराम कुर्हाडे, अनिल भांडवलकर, रघुनाथ वीरकर, सदाशिव कुर्हाडे, पांडुरंग वरखडे, बबनराव वहिले, प्रकाश घुंडरे, रामदास घुंडरे यांचा समावेश आहे. छाननी प्रक्रियेत माजी नगराध्यक्ष बबनराव कुर्हाडे व बाबुलाल घुंडरे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते.
महिला प्रतिनिधींसाठी दोन जागा
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधीसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी सुभाष सोनवणे व माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. महिला प्रतिनिधींसाठी दोन जागा राखीव असून, यासाठी माजी नगरसेविका सुशिला कुर्हाडे, ताराबाई मुंगसे व भीमाबाई भांडवलकर यांच्या अर्जांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीयसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी शशिकांत घुंडरे, सोमनाथ मुंगसे यांचे अर्ज दाखल आहेत.
पुढार्यांची प्रतिष्ठा पणाला
आळंदी विकास सोसायटीची निवडणूक संस्थेच्या हितासाठी बिनविरोध व्हावी, अशी अनेक सभासदांची इच्छा आहे. यासाठी स्थानिक पुढारीदेखील प्रयत्नशील आहेत. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांच्या गाठी-भेटी सुरू आहेत. मनधरणी, पुढच्या वेळचे आश्वासन देणे, असे प्रयत्न पुढार्यांकडून सुरू आहेत. निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी पुढार्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. बिनविरोध निवडीच्या प्रयत्नास यश न आल्यास निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.