पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या बिन्स कंटेनर खरेदीत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या तुलनेत दुप्पट दराने सदरची कंटेनर खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांनी याबाबत सत्ताधारी भाजपला अंधारात ठेवले आहे. अधिकार्यांनी भाजप पदाधिकारी आणि शहरवासीयांच्या डोळ्यात धुळफेक करून कंटेनर खरेदीचा गैरव्यवहार केला आहे. अशा दोषी अधिकार्यांचे निलंबन करून संबंधित पुरवठादार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून या व्यवहारातील रक्कम वसूल कण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
अधिकार्यांना काळ्या यादीत टाका
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अमोल थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी 4.5 घनमीटर बिन्स कंटेनर खरेदी करण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्या भांडार विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 230 बिन्स कंटेनर खरेदी करण्यात आले; मात्र यासाठीची निविदा प्रक्रीया पारदर्शीपणे राबविण्यात आली नाही. कोणत्याही प्रकारची स्पर्धा न होता संबंधित पुरवठादार ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने बिन्स कंटेनर खरेदीत गैरव्यवहार करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी या प्रकरणी दोषी आहेत. अशा दोषी अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणेही आवश्यक आहे.
दोन्ही पुरवठादारांचे दर एकसारखे कसे?
आरोग्य विभागासाठी 4.5 घनमीटरचे एकूण 230 बीन्स कंटेनर खरेदीबाबत निविदा प्रसिध्द करण्यात आली. यात मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि रेखा इंजिनिअरिंग या दोन पुरवठादार ठेकेदार संस्थांनी निविदा भरल्या. संबंधित पुरवठादार ठेकेदारांनी बिन्स कंटेनरचा प्रति नग दर 74 हजार 777 रुपये असा दिला. ऑनलाईन आणि गुप्तपध्दतीने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रीयेत दोन पुरवठादारांनी सादर केलेले दर तंतोतंत एकसारखे असणे अशक्य असते. असे असल्यास पुरवठादार ठेकेदार संस्था यांचे संबंधित अधिकारी किंवा परस्परांमध्ये संगनमत असल्याचे निष्पन्न होते. मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि रेखा इंजिनिअरिंग या दोन पुरवठादार ठेकेदार संस्थांकडून आलेल्या दरांबाबत संशयाला जागा आहे. असे असतानाही महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांनी याबाबत स्पर्धा न करता आणि दरांबाबत नव्याने गुप्त अहवाल न मागविता किंवा पुनर्निविदा प्रसिध्द न करता मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि रेखा इंजिनिअरिंग या दोन ठेकेदारांकडून बिन्स कंटेनर खरेदी करण्यात आली.
निविदेपेक्षा कमी दर
महापालिका अंदाजपत्रकीय दरानुसार 1 कोटी 75 लाख 95 हजार रुपये इतकी किंमत निविदेची होती; मात्र निविदाकारांकडून अर्थात पुरवठादार ठेकेदार संस्थांकडून एक कोटी 71 लाख 75 हजार 710 रुपये असा लघुत्तम दर प्राप्त झाला. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय दरानुसार सदरचा दर 2.38 टक्क्यांनी कमी होता. त्यानुसार मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन या पुरवठादार ठेकेदार संस्थेकडून 115 आणि रेखा इंजिनिअरिंग या पुरवठादार ठेकेदार संस्थेकडून 115 असे एकूण 230 बिन्स कंटेनर 74 हजार 777 रुपये प्रती नग या दराप्रमाणे खरेदी करण्यात आले. लघुत्तम निविदाकार हा निकष लावत मेसर्स निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन या पुरवठादार ठेकेदार संस्थेला 85 लाख 87 हजार 855 रुपये आणि रेखा इंजिनिअरिंग या पुरवठादार ठेकेदार संस्थेला 85 लाख 87 हजार 855 रुपये अशा पध्दतीने निविदा विभागून देण्यात आली. त्यानुसार या दोन्ही पुरवठादार ठेकेदार संस्थांकडून बिन्स कंटेनर खरेदी करण्यात आली.
‘आयटीआय’चा अहवाल चुकीचा
बिन्स कंटेनर खरेदी करताना त्याची तांत्रिक तपासणी रॅण्डमली (ठरपवेाश्रू) करण्यात येते. या तपासणीतही मोठा गोंधळ आहे. महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयकडून या बिन्स कंटेनरची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. कंटेरच्या पत्र्याचा गेज (जाडी) आणि त्याचा दर्जा आदीबाबत निविदेप्रमाणे सातत्य राखण्यात आलेले नाही. कंटेनरचा पत्रा कमी गेजचा (जाडीचा) आणि सुमार दर्जाचा आहे. असे असतानाही बिन्स कंटेनर खरेदी योग्य असल्याचा तपासणी अहवाल मोरवाडी येथील आयटीआयकडून देण्यात आला आहे. आयटीआयचे संबंधित निदेशक आणि प्राचार्य यांना हाताशी धरून सदरचा तपासणी अहवाल प्राप्त करण्यात आला असल्याचे यावरून दिसून येते. असे करताना तपासणी अहवाल मिळविण्यासाठीही मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे यावरून निष्पन्न होत आहे. अशा पध्दतीने करण्यात आलेली बीन्स कंटेनर खरेदी म्हणजे महापालिका प्रशासनाचा अंदाधुंद कारभार आहे.
पुरवठादार ठेकेदारांना धरले हाताशी
पुणे महापालिकेने 3.8 घन मीटरचे बिन्स कंटेनरची नुकतीच खरेदी केली आहे. प्रति नग 34 हजार रुपये या दराने पुणे महापालिकेने सदरचे बिन्स कंटेनर खरेदी केले. ज्याअर्थी 3.8 घनमीटरचा कंटेनर केवळ 34 हजार रुपयांना उपलब्ध होत आहे, त्याअर्थी 4.5 घनमीटरचा कंटेनर 40 हजार रुपये दरात सहज उपलब्ध होऊ शकतो; मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 4.5 घनमीटरच्या बिन्स कंटेनरच्या प्रति नगासाठी 74 हजार 777 रुपये दर देण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या तुलनेत दुप्पट दराने ही खरेदी होत असल्याचे यातून दिसून येते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील संबंधित अधिकार्यांनी बिन्स कंटेनरच्या बाजारातील दराबाबत माहिती न घेता केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने अपारदर्शीपणे बिन्स कंटेनर खरेदीची निविदा राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांनी पुरवठादार ठेकेदारांना हाताशी धरून बिन्स कंटेनर खरेदीत मोठा गैरव्यवहार केला आहे.
सत्ताधारी भाजप अंधारात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील कार्यशैलीनुसार कार्यरत राहून महापालिका प्रशासनातील अधिकार्यांकडून चुकीचा आणि भ्रष्ट कारभार करण्यात येत आहे. असे करताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अंधारात ठेवण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यातील संबंधित दोषी अधिकार्यांवर आणि चुकीचा तपासणी अहवाल देणार्या मोरवाडी आयटीआयच्या संबंधित निदेशक, प्राचार्य आदींवर योग्य कारवाई करण्यात यावी. या सर्वांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. संबंधित निविदाकार अर्थात पुरवठादार ठेकेदार संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, चुकीचा दर देऊन भ्रष्टाचार करून आणल्याप्रकरणी आणि महापालिकेची आर्थिक फसवणूक करून आणि निविदेतील अटी-शर्तीनुसार दर्जेदार मालाचा पुरवठा न केल्याप्रकरणी संबंधित पुरवठादार ठेकेदार संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्याकडून संबंधित बिन्स कंटेनर खरेदी व्यवहारातील रक्कम वसूल करण्यात यावी अशीही मागणी थोरात यांनी या निवेदनातून केली आहे.