दहशत कायम ; शेतमजुरांमध्ये घबराट, बंदोबस्ताची मागणी
रावेर-: तालुक्यातील केर्हाळा शेती-शिवारात बिबट्याने दोन गोर्ह्यांचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्याने पुन्हा शेतमजुरांमध्ये घबराट पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील केर्हाळा शिवारातील भरत रामदास पाटील यांच्या शेतात जूनोना येथील गुरांचा कळप मुक्कामी होता. सोमवारच्या मध्यरात्री नंतर बिबट्याने आपला मोर्चा कळपाकडे वळविला व त्यात त्याने दोन गोर्ह्यांना लक्ष करीत हल्ला चढवून ठार केले. जूनोना येथील जयराम रसाल राठोर, गोर्वधन भीमा राठोर यांच्या मालकीचे प्रत्येकी एक गोर्हा आहे. अहिरवाडी वनपाल एस.के.सोनवणेंसह त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांनी मयत जनावरांचे पोस्टमार्टेम केले.
शेतकरी-शेतमजुरांमध्ये घबराट कायम
गत काही दिवसांपासून तालुकाभरात वेग-वेगळ्या ठिकाणी बिबट्या, वाघाचे दर्शन सुरू आहे. वन विभाग कुठे पगमार्ग शोधतोय तर कुठे जाहिर कार्यक्रमाद्वारे प्राण्यांची माहिती नागरिकांना देतोय परंतु बिबट्याबद्दल त्यांना काही ठोस उपाय करता आलेला नाही, असा सूर शेतकर्यांमधून उमटत आहे.