जुन्नर । नेतवड येथील कुटेमळा परिसरात बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. शनिवारी नंदा कुंडलिक वाघमारे (वय 60) या सकाळी 6 च्या दरम्यान आंघोळीचे पाणी (बंब) तापवण्यासाठी घरातून बाहेर आल्या.
त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर सलग दोनवेळा जोरदार हल्ला केला. त्यांच्या ओरडण्याने घरातील व्यक्ती बाहेर आल्यावर बिबट्याने शेजारील शेतात धूम ठोकली. बिबट्याशी झालेल्या झटापटीत त्यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वीच येथून जवळच असलेल्या लोकेश्वर मळ्यातील पुष्कर वायकर व शशिकांत येंधे यांच्यावरदेखील बिबट्याने हल्ला केला होता. या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. यावर वनविभागाने लवकर उपाय योजना आखावी, अशी मागणी उपसरपंच देवराम कुटे, पोपट गायकवाड, राजू शिरसाट, सरपंच धनंजय बटवाल यांनी केली आहे.