भुसावळ- मेंढीवर विष प्रयोग करून बिबट्याला ठार केल्याच्या संशयावरून मेंढपाळ ज्ञानेश्वर उर्फ नाना जगन धनगर (36, रा.वरणगाव) यास वनविभागाने ताब्यात घेतले होते. मंगळवारी त्यास भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.एफ.एल.वैद्य यांनी त्यास एक दिवसाची वनकोठडी सुनावली. वरणगाव शिवारातील मन्यारखेडा नाल्याजवळ रविवारी पहाटे संशयास्पद अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळापासून काही अंतरावर एका पिशवीत मृत मेंढीसह मासाचे तुकडे आढळले होते. या प्रकरणी वनविभागाने वैद्यकीय पथकामार्फत जागेवरच शवविच्छेदन केले होते तर व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर याबाबत निश्चित कारण सांगण्यात येईल, अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या मेंढपाळ ज्ञानेश्वर उर्फ नाना जगन धनगर (वय 36 रा. वरणगाव) यास मंगळवारी भुसावळ न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड.नवाब अहमद यांनी तर आरोपींतर्फे अॅड.सुनील चौधरी यांनी युक्तीवाद केला.