भुसावळात वनविभागाची कारवाई ; तीन दुचाकी केल्या जप्त
भुसावळ- बिबट्याच्या कातडीची अवैधरीत्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने भुसावळात लावलेल्या सापळ्यात चौघा आरोपींच्या वनविभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींकडून बिबट्याची कातडी, तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. रात्री उशिरा आरोपींना तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अतिशय गुप्त पद्धत्तीने ही कारवाई करण्यात आली तर रात्री उशिरापर्यंत कारवाईची माहिती वनविभागाने जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुप्त माहितीनुसार वनविभागाकडून कारवाई
बुधवारी भुसावळ येथे काही तस्कर बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. जळगाव वनविभागाच्या फिरत्या पथकासह मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल मुक्ताईनगर यांनी केलेल्या कारवाईत चौघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून बिबट्याची कातडी तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल पी.टी.वराडे, फिरत्या पथकाचे धनंजय पवार, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, पी.जे.सोनवणे, अनिल साळुंखे, भरत पवार, ललित गवळी, सुनील पवार, देविदास जाधव, प्रसाद भारुडे, गणेश गवळी, उमाकांत कोळी, संजय चिंचोले तसेच वाहन चालक विजय शेलार, प्रीतम कोळी यांचा सहभाग होता.
30 लाखांमध्ये सौदा ; परप्रांतीय आरोपींच्या आवळल्या मुसक्या
आरोपींच्या अटकेसाठी डमी ग्राहक तयार करण्यात आला तर बिबट्याच्या कातडीसाठी तब्बल 30 लाखांचा सौदा ठरला. ठरल्याप्रमाणे तस्कर बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भुसावळातील जामनेर रस्त्यावर पोहोचले व त्यानंतर वनविभागाने लावलेल्या सापळ्यानंतर सुरेश गजानन झाल्टे (बोरखेडा, ता.बुलढाणा), कृष्णकुमार अमरसिंग बेग (बर्हाणपूर, मध्यप्रदेश), दिलीप अमरसिंग बेग (बर्हाणपूर, मध्यप्रदेश) व नंदकिशोर रामचंद्र खवळे (अमळनेर, ता.जळगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी बिबट्याची शिकार कुठे केली? शिवाय यापूर्वी किती शिकारी केल्या तसेच या शिकारीत आणखी त्यांचे कोण-कोण साथीदार आहेत याबाबत गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर वनकोठडीत माहिती घेतली जाणार आहे. आरोपींच्या अटकेनंतर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनविभागाने कारवाई केल्यानंतर ही माहिती गुप्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.