मुंबई : गोरेगाव फिल्म सिटी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या 5 घटना घडल्यानंतर आता महाराष्ट्र वन विभागाने पुढील आठ दिवस फिल्म सिटीतील होणारे चित्रीकरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जोवर बिबट्याला जेरबंद केले जात नाही, तोवर चित्रीकरण करू नये, असे वन विभागाने फर्मान सोडले आहे. याला दादासाहेब फाळके चित्रनगरीतील अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे. वन खात्याच्या आदेशानुसार आम्ही पुढील आठवडाभर चित्रीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मुंबईतील पर्यायी ठिकाणांचा विचार करत आहोत. कारण कलाकार आणि कामगारांच्या जीवाने मोल अधिक आहे, असेही फिल्म सिटीचे अधिकारी म्हणाले.
20हून अधिक बिबट्यांचा वावर
फिल्म सिटीचा भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमाभागात आहे. त्या ठिकाणी बिबट्यांची संख्या 20हून अधिक वाढलेली आहे. त्यामुळे या भागात आता बिबट्यांची वर्दळ वाढलेली आहे. मार्च ते जुलै 2017 या कालावधीत या भागात या बिबट्याच्या हल्ल्यातून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन खात्याने या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्याकरता फिल्म सिटीच्या परिसरात 5 कि.मी. अंतरावर पिंजरे लावले आहेत.
फिल्म सिटीच्या परिसरात वावरतोय बिबट्या
एकूण 30 वन अधिकारी या भागात पेट्रोलिंग करत असतात. सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाल्यानुसार बिबट्या पिंजर्याच्या परिसरात वावरत असल्याचे दिसून आले आहे, मात्र वाहनांच्या आवाजामुळे तो पळून जात असल्याचे वन अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फिल्म सिटीतील प्रशासनाला आम्ही पुढील काही दिवस चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे बिबट्याच्या सांभाव्य हल्ल्याच्या घटना रोखणे शक्य होईल, असेही हे अधिकारी म्हणाले. या फिल्म सिटीमध्ये सुमारे 800 लोक काम करतात. वन खात्याच्या विनंतीवरून फिल्म सिटी प्रशासनाने पुढील आठवडाभर चित्रीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातील घटना
1. 21 मे रोजी 3 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
2. 17 मार्च रोजी 3 वर्षीय मुलगा जखमी
3. 29 मे रोजी 4 वर्षीय मुलगा जखमी
4. 22 जुलै रोजी 2 वर्षांचा मुलगा विहान गरुडा याचा मृत्यू
5. 28 जुलै रोजी 13 वर्षीय मुलगा अनिकेत पागे जखमी