बिबट्याच्या पिल्लांच्या अफवेने खळबळ

0

शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता.शिरूर) परिसरातील जातेगाव, वाजेवाडी, करंदी, केंदूर यांसह आदी भागामध्ये वारंवार बिबट्याचे दर्शन होत होत आहे. काही वेळा बिबट्याने जनावरे देखील फस्त केलेली असून नागरिकांवर सिद्ध हल्ले चढविले आहेत. तर शुक्रवारी अचानक बिबट्याची पिल्ले आढळून आली असल्याची अफवा पसरली असल्याने नागरिकांची व वन विभागाच्या अधिकार्‍यांची चांगलीच खळबळ उडाली.

काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला असल्याची घटना घडली असताना शुक्रवारी सकाळी ज्या ठिकाणी बिबट्याचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणाहून अगदी काही मिटर अंतरावरच असेलल्या तांबेवस्ती येथे सोमनाथ सोंडेकर यांच्या शेतामध्ये ऊस कामगार ऊस तोडत असताना त्यांना अचानक एका ठिकाणी बिबट्यासदृश प्राण्याची पिल्ले आढळून आली. त्यावेळी ऊसतोड कामगारांनी ऊस तोड बंद करून आरडाओरडा करण्यास सुरवात केली. परंतु ज्या ठिकाणी बिबट्या मृत झाला होता त्याच ठिकाणी बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले आढळून आली असल्याने नागरिकांमध्ये देखील चांगलीच खळबळ उडाली.

पिल्ले उदमांजराची
दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बेंडभर, प्रकाश वाजे, आनंत जगताप, स्वप्नील शेळके, गजानन सोंडेकर यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथे पहिले असता त्यांना बिबट्यासदृश प्राण्याची तीन पिल्ले दिसून आली यावेळी आम्ही नेहमीच ऊसतोडत असून आत्ता येथे मिळालेली पिल्ले बिबट्याचीच असून बिबट्या पळून जात असल्याचे आम्ही पहिले असा दावा ऊसतोड कामगारांनी केला. त्यांनतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे, वनपाल सयाजी गायकवाड, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग सर्पमित्र गणेश टिळेकर, अतुल थोरवे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी नागरिकांना आढळून आलीली पिल्ले बिबट्याची नसून उदमांजराची असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जाहीर केले.

वनविभागाचे आवाहन
तसेच यावेळी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तेथे आजूबाजूला पाहणी केली असता कोठेही बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाही त्यामुळे तेथील नागरिकांनी आणि ऊसतोड कामगारांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. तर यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता कोठेही बिबट्या आढळून आल्यास घाबरून न जाता. नागरिकांनी शेतात जाताना मोठमोठ्याने आवाज करत जाण्याचे, फटाके वाजविण्याचे तसेच वनविभागाला कळविण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी केले आहे.