जुन्नर : साकोरी गावाच्या उत्तरेला आसामी शिवारात सौरभ शांताराम गाडगे हे बाप-लेक दुचाकीवरून घरी परतत असताना, दबा धरलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. बिबट्याची झेप दुचाकीवर पडली, पण मोठ्या धाडसाने सौरभने दुचाकी तशीच पुढे घेऊन गेल्याने दोघेही बाप-लेक वाचले.
बिबट्याच्या या हल्ल्यात सौरभ याच्या पायाच्या मांडीला आणि घोट्याला जखमा झाल्या असून, त्याला तातडीने उपचारासाठी निमगावसावा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच बेल्हे वनपाल दत्ता फापाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी बिबट्याचे ठसे आढळून आले. तेथे पिंजरा लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.