बिबट्याच्या हल्ल्यात एकजण ठार; सोयगाव परिसरातील घटना

0

सोयगाव । सोयगाव परिसरात मुक्तसंचार करणारा बिबट्या नरभक्षक झाल्याची घटना तालुक्यातील रामपूरवाडी शिवारातील जांभूळ नदीच्या तीरावरील घनदाट झाडीत गुरुवारी 14 डिसेंबर रात्री 8 वाजेच्या सुमारास मृत व्यक्तीच्या आढळलेल्या पायावरून स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या व पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला आहे. संजय नामदेव पाटील (वय 50, रा.कवली ता.सोयगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संबंधित मृत व्यक्तीच्या मुलगा राजेंद्र पाटील याने त्याच्या पित्याच्या घातलेल्या पॅटवरून ओळख पटविली आहे. दरम्यान शेतकरी संजय पाटील हे 2 दिवसापासून घरातून शेतात जातो असे सांगून गेला असता, त्याचा मृतावस्थेत रामपूरवाडी गावाच्या पाठीमागे असलेल्या जांभूळ नदीच्या घनदाट झाडीत त्याचा फक्त पायच आढळला. दरम्यान नरभक्षक झालेल्या बिबट्याने त्याच्या नरडीचा घोट घेवून उर्वरित शरीर ओरबडून तीन ठिकाणी फरफटत ओढत नेल्याचे घटनास्थळी आढळले. त्यातच मृत व्यक्तीच्या अंगावरील कपडे फाटक्या अवस्थेत घनदाट झुडपात आढळून आले आहे. दरम्यान तालुक्यातील रामपुरा येथील पोलीस पाटील मुलचंद राठोड याचे तक्रारीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

14 रोजी पहाटे शेतात दिसल्याचा संशय
पोलीस निरीक्षक सुजित बडे यांचेसह पोलिसांचे पथक घटनास्थळी रात्रभर ठाण मांडून आहे. विशेष तपास पथकाचे शांताराम सपकाळ,विष्णू ढाकणे यांना तातडीने औरंगाबादवरून पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याच्या मृत झाल्याच्या घटनेमुळे सोयगाव परिसरात रात्रभर मोठी घबराट पसरली आहे. मृत संजय पाटील यास कवली शिवारातून बिबट्याने चक्क तोंडात धरून उचलून आणल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान रात्रीची वेळ असल्यामुळे वनविभागाच्या पथकाला घटनेचे कोणतेही ठोस पुरावे संकलित करता आलेले नाही. दरम्यान गुरुवारी 14 डिसेंबर पहाटे शेतात जाणार्‍या काही मजुरांना जवळच असलेल्या निंबायती ता.सोयगाव शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याचे मजुरांनी सांगितले. दरम्यान निंबायती ता.सोयगाव गावालगत काही नागरिकांनी बिबट्याची विष्ठाही पाहिल्याचे सांगितले. सोयगाव परिसरात आठवड्याभरापासून मुक्तसंचार करणारा चवताळलेल्या बिबट्याने सोयगाव परिसरातील रामपुरवाडी ता.सोयगाव परिसरात पहिला बळी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे सोयगाव परिसरात मुक्तसंचार करणारा बिबट्या नरभक्षक झाला असल्याचे घटनेवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित बडे, जमादार त्रिलोकचंद पवार, संदीप चव्हाण, शिवदास गोपाळ, दिलीप तडवी आदींसह पोलिसांचे पथक ठाण मांडून आहे. रात्री उशिरापर्यंत या परिसरात नागरिकांनी वावरू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वनविभागाने गांभीर्य नाही
सोयगावसह बहुलखेडा, वेताळवाडी, निंबायती, रामपुरा, वरसाडे तांडा, निमखेडी आदि भागात मुक्तसंचार करून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने गांभीर्याने घेतले नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान मृत शेतकर्‍यावर झालेला बिबट्याचा हल्ला इतका जोरदार होता कि, मृत शेतकरी संजय पाटील याचे कपडे फाटक्या अवस्थेत घनदाट झाडीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले.

रामपूरवाडी गावाला धोका
दरम्यान नरभक्षक बिबट्याने लचके तोडून-तोडून शेतकर्‍यावर जोरदार हल्ला चढविला असल्याचे आढळलेल्या पायावरून स्पष्ट झाले आहे. घटनेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या रामपूरवाडी या गावातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असल्याने सायंकाळी पासून गावातील नागरिकांनी दहशतीपोटी स्थलांतर सुरु केले होते.