चाळीसगाव । मेंढपाळ कुटुंबाकडे कामाला असलेल्या 12 वर्षीय मुलाचा देशमुखवाडी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली असून या हल्ल्यामुळे पुन्हा शेत शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी दोन्ही मेंढ्यांच्या पिल्लांना देखील ठार केल्याचे समोर आले आहे. वेहेळगाव ता. नांदगाव येथील काळू देवा सोनवणे (वय-12) हा मुलगा जामधरी ता. नांदगाव येथील एका मेंढपाळ कुटुंबाकडे कामाला होता. ते मेंढपाळ कुटुंब चराईसाठी सध्या देशमुखवाडी शिवारात बसले आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास काळू सोनवणे या मुलावर बिबट्याने हल्ला करून कापसाच्या शेतात ओढून नेले होते.
बिबट्याने त्याच्या मानेवर मांडीवर मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच बिबट्याने दोन मेंढ्यांच्या पिलांना देखील ठार केले आहे. मयताच्या आई वडीलांची हालाखीची परीस्थिती असल्यामुळे ऊसतोडणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात गेले असल्याची माहिती परीसरातील मेंढपाळ कुटूंबाकडून कळाले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे. गेल्या चार महिन्यांपासून वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याल पकडण्यात अपयश आल्याचे समोर आले आहे.