बिबट्यासाठी लावलेला पिंजरा एक वर्षानंतरही रिकामा

0

देहूरोड । मागील वर्षी किन्हई येथे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेला पिंजरा वर्ष पूर्ण झाले तरी रिकामाच आहे. एका जागी पडुन राहिल्यामुळे पिंजर्‍याची दुरावस्था झाली आहे. सध्या हा पिंजरा गावकर्‍यांसाठी विशेषतः तरूणांसाठी शोभा ठरू लागला आहे.

गतवर्षी 8 ऑगस्टला किन्हई गावाच्या हद्दीत पडाळीवर राहणार्‍या संकेत काळे यांच्या गोठ्यात बांधलेले रेडकू बिबट्याने ठार केल्याचा प्रकार घडला होता. प्राणीमित्र आणि वनअधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळुन आले होते. भांबुर्डा वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी एकनाथ माने आणि वनरक्षक मधुकर गोडगे यांनी या ठिकाणी परिस्थितीची माहिती घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. त्यानुसार सुरूवातीचे दहा बारा दिवस पिंजर्‍याजवळ बिबट्या आला, मात्र पिंजर्‍यात अडकू शकला नव्हता. कालांतराने ग्रामस्थही बिबट्याच्या दहशतीतून सावरले. पुढे वनविभागाचे अधिकारी या पिंजर्‍याकडे फिरकणेही बंद झाले.

सध्या हा पिंजरा पडाळीजवळ अतिशय दुरवस्थेत पडून आहे. वर्ष झाले तरी हा पिंजरा इथे पडून आहे. पिंजर्‍याचे दार केव्हाचे बंद झाले आहे. भक्ष्य म्हणून ठेवण्यासाठी आणलेली बकरी पैसे न दिल्यामुळे मालकाने तीन चार दिवसांतच काढून नेली होती. त्यामुळे सध्या हा पिंजरा केवळ दिखावा ठरत पडुन आहे. रस्त्याने येणारे जाणारे कुतूहलाने या पिंजर्‍याकडे पाहतात, तेव्हा वर्षभरापुर्वीच्या आठवणी ताज्या होतात, असे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे यांनी सांगितले. सुरूवातीच्या काळात या पिंजर्‍यासमोर थांबून सेल्फी काढण्याची क्र्रेझ तरुणांमध्ये होती. आता मात्र, त्याकडे कुणी ढुंकूनही पाहिना अशी अवस्था असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकंदरीतच, ज्या कुटूंबाचा जीव वाचविण्यासाठी हा पिंजरा लावला होता, त्याच कुटूंबासाठी तो आता अडचण ठरू लागला आहे.