बिबट्या ठरतोय वनविभागाच्या अनास्थेचा बळी

0

मुक्ताईनगर तालुक्यात पाच वर्षात चार वाघासह बिबट्याचे बळी

भुसावळ (गणेश वाघ)- मुक्ताईनगर तालुक्यात पाच वर्षात तब्बल चार बिबट्यांसह वाघांचे बळी वनविभागाच्या अनास्थेने झाले आहेत. दुष्काळी स्थितीमुळे जंगलातील पाणवटे आटले असून खाद्य कमी झाल्याने खाद्याच्या शोधार्थ हिंस्त्र प्राणी अधिवासाबाहेर पडत आहेत मात्र हीच बाब नेमक्या शिकारींच्या पथ्थ्यावर पडत आहे. वनविभागाकडे कुशल मनुष्यबळासह मॉनिटरींगचा अभाव तसेच साधनसामुग्रीची कमतरता असल्याने नेमके बिबट्यांसह वाघांचे बळी जात असल्याचा वन्यप्रेमींचा आरोप आहे. रविवारी दुपारी वरणगाव शिवारात पुन्हा ठिपकेदार बिबट्याचा मृतदेह आढळल्याने हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिकार की अपघाताचा बळी?
माजी सैनिक अनिल पाटील यांच्या वरणगाव शिवारातील केळी बागेत अंदाजे चार वर्ष वयाच्या ठिपकेदार बिबट्याचा रविवारी सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. रविवारी सकाळी शेळ्या-मेंढ्या चारणार्‍यांना केळी बागेत मृत बिबट्या आढळल्याने त्यांनी शेतकर्‍यांना माहिती दिल्यानंतर वनविभागाला माहिती कळवण्यात आली. बिबट्याची नखे व कातडी सहिसलामत असलीतरी त्यांच्या तोंडातून रक्त येत असल्याने एखाद्या वाहनाला त्याला धक्का तर बसला नसावा ना? अशी शंकाही उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे वनपाल बोरसे, दीपाली जाधव यांच्यासह वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तर मुक्ताईनगर वनपरीक्षेत्राचे आरएफओ आशुतोष बच्छाव व वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होत असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल असे बच्छाव म्हणाले. दरम्यान, शेतकरी पाटील यांचे मन्यारखेड्याला लागून मात्र वरणगाव शिवारात गट क्रमांक 692 मध्ये केळीचे शेत आहे व शेताच्या खाली मोठा नाला आहे. पाणी पिण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याची शिकार झाली की एखाद्या वाहनाचा मोठा फटका लागल्यानंतर पाण्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या मयत झाला? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. बिबट्याच्या नाका-तोंडातून मात्र रक्तस्त्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पाच वर्षात तीन वाघांसह बिबट्याचा मृत्यू
मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागात मार्च 2018 मध्ये सुकळी शिवारातील गट क्रमांक 48 मध्ये जयराम काशिराम पाटील यांच्या शेतात वाघीण मृतावस्थेत आढळून होती तर या घटनेच्या पाच महिन्यानंतर रविवार, 12 ऑगस्ट 2018 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा गावालगत पूर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला होता. नंतर तपासात या वाघाची शिकार झाल्याचे निष्पन्न होवून आरोपींना अटकही करण्यात आली होती तर यापूर्वीच्या काळात एका छाव्याचाही मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर रविवारी वरणगाव शिवारात पुन्हा ठिपकेदार बिबट्याचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

वनविभागाच्या अनास्थेत वन्यप्राणी गावाकडे
अन्न साखळीतील सर्वात मोठा प्राणी असलेल्या वाघाचा वढोदा वनपरीक्षेत्रासह सातपुड्यात वावर आहे मात्र हल्लीच्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत तर जंगलात कुत्री, डुकरे आदींचे भक्ष्य मिळत नसल्याने हे हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत शिवाय गावाजवळील शेत-शिवारात केळी बागांमध्ये आसरा घेत आहे. केळी बागांमध्ये उन्हासह थंडीपासून बचाव होत असल्याने व सुरक्षित जागा असल्याने ही जागा त्यांना भावत आहे.

वनविभागाची नियमावली शिकार्‍यांच्या पथ्यावर
प्रादेशिक, वन्यजीव अभयारण्य व संवर्धन राखीव क्षेत्राच्या दर्जामुळे विविध नियम शिकारीसाठी लागू पडत असल्याची चर्चा आहे त्यातच काही दिवसांपूर्वीच वढोदा वनपरीक्षेत्रात हरणाची 22 शिंगे सापडल्याची घटना जाती असतानाच दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगरातील धाबेपिंप्री गावाजवळीत पाड्यातून अस्वलाची शिकार करणार्‍यांना अटक करण्यात आली. वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात वनविभागाची होत असलेली तोडकी गस्त, पुरेशा मनुष्यबळाचा अभाव तसेच ट्रॅप कॅमेर्‍यांचा अभाव शिकार्‍यांच्या पथ्थ्यावर पडत आहे.