खा. आढळराव यांनी मुख्यमंत्री व मनेका गांधी यांना पाठविले पत्र
एकाच वर्षात 108 बिबटे सुरक्षित पकडले
शिक्रापूर : यवतमाळची ‘टी-1’ वाघीण ‘अवनी’ हिला नरभक्षक असल्याच्या कारणाने ठार मारल्याचे प्रकरण देश पातळीवर गाजत आहे. अशा नरभक्षक वाघ-वाघिणीला जिवंत पकडण्याबाबत सन 2003-04 च्या दरम्यान जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त कसा केला गेला आणि तो देशभरात कसा अनुकरणीय आहे, याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना पाठविले आहे.
एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात 108 बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. एकाच वर्षात (2013-14) बिबट्याच्या हल्ल्यात केवळ जुन्नर तालुक्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच गंभीर परिस्थितीत सन 2003मध्ये या भागात बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलीस व वनखात्याला देण्यात आले होते. त्यासाठी सशस्त्र पथकेदेखील दाखल झाली होती. मात्र तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमंत गायकवाड, वैभव भालेराव, बी. टी. हगवणे, संजय कडू व त्यांच्या सर्व वन कर्मचारी- अधिकार्यांनी बिबट्या पकडण्यासाठीचे काही वेगळ्या धाटणीचे पिंजरे तयार करून बिबटे पकडण्याची वेगळीपद्धत अमलात आणली. स्थानिक लोकांचा सहभाग, त्यांचे सल्ले आणि प्रत्यक्ष कारवाईत त्यांचा सहभाग, असे या कामगिरीचे स्वरूप होते.
वनखात्याच्या याच कार्यपद्धतीला ‘जुन्नर पॅटर्न’ असे संबोधले. कारण बिबट्याला गोळ्या घालण्याचे वनखात्याचे आदेश असतानाही या पॅटर्नमुळे त्या एकाच वर्षात 108 बिबटे पिंजर्यात सुरक्षित पकडले होते. यातील 63 बिबटे प्रादेशिक स्थलांतर योजनेअंतर्गत चांदोली, कोयना, दाजीपूर, बोरिवली येथील अभयारण्यात सोडण्यात आले होते. या कामगिरीची दखल नॅशनल जिऑग्राफिक वाहिनीसह लिम्का बुक रेकॉर्डमध्येही नोंदली गेली. या पुढे कुणाही वाघ-वाघिणीच्या नशिबी ‘अवनी’सारखे दुर्दैव मृत्यू येऊ नये, यासाठी बिबट्यांना पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ संपूर्ण देशभर लागू करावा, असे या पत्रात नमूद केले आहे.
येत्या अधिवेशनात मागणी
बिबट्यांचा त्रास हा आता राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला आहे. त्यामुळे याबाबत सर्वंकष ठोस धोरण बनवायला हवे. ‘जुन्नर पॅटर्न’सारखा पर्याय देशभर राबवावा आणि बिबट्यांसह देशातील नागरिकही सुरक्षित राहावे, अशा आशयाची मागणी आपण येत्या लोकसभा अधिवेशनात करणार आहे. त्यासाठी मनेका गांधी यांना भेटून याबाबत बोलणार असल्याचेही आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.