बिबट्या पडला विहिरीत

0

वेंगुर्ले । शिकारी खुद शिकार हो गया, हे हिंदी चित्रपटातील गाणे तुम्हाला ठाऊक असेलच. असेच काहीसे वेंगुर्ले येथील दाभोली येथे झाले आहे. शिकारी बिबट्याच्याबाबतीत घडले आहे. दाभोली नागडेवाडी येथे रविवार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत आलेला बिबट्या आणि कुत्रा दोन्ही 20 फूट खोल पाणी असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मृत बिबट्याला व कुत्र्याला बाहेर काढले. दाभोली नागडेवाडी येथील दादा पेडणेकर यांना रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुत्रा जोरजोरात भुंकत असल्याचे ऐकू आले. ते बाहेर आले त्यावेळी बिबट्याने कुत्र्याची पाठ धरली होती. त्या झटापटीत अखेर कुत्रा जवळच्या खोल विहिरीत पडला. त्यापाठोपाठ बिबट्याही विहिरीत पडला. पेडणेकर यांनी या घटनेची कल्पना पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर यांना दिली. त्यांनी तातडीने वन विभागाला कळवले.

खोल विहिरीच्या तळाशी
रविवारी सकाळी 8 वाजता वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत 20 फूट खोल पाणी असल्याने त्यात पडलेला बिबट्या आणि कुत्रा हे विहिरीच्या तळाशी गेले होते. अखेर येथील ग्रामस्थ प्रसाद हळदणकर, प्रवीण बांदवलकर व आदी मंडळी हे खोल विहिरीत उतरले. त्यांनी विहिरीच्या तळाला मृत अवस्थेत असलेल्या वाघाला ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढले. मृत वाघाचा पंचनामा करून वन विभागाने तो आपल्या ताब्यात घेतला.