बियर वितरण करणार्‍या कंपनीला 21 कोंटीचा गंडा

0

पुणे । प्रसिद्ध यु. बी. बियरचे महाराष्ट्रात वितरण करणार्‍या खाजगी वितरण कंपनीला दोन संचालकांनी तब्बल 21 कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रवी अय्यास्वामी रामसुब्रमण्यम (वय 56, रा. कोंढवा) व राजीव दिपक माटा (वय 47, रा. कल्याणीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरज रावल (वय 64, रा. मुंबई) यांची आईस्ड डेझर्टस अँड फुड पार्लर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. पुण्यातील रमाबाई आंबेडकर रोडवर कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. रावल यांच्या कंपनीतर्फे यु. बी. बियरचे पुर्ण महाराष्ट्रात (मुंबई वगळता) 42 ठिकाणी वितरण करण्यात येते. रामसुब्रमण्यम हा 1999 पासून त्यांच्या कंपनीत नोकरी करतो. तर, राजीव माटा हा 2006 पासून नोकरीला आहे. रामसुब्रमण्यम याची 2007 साली कंपनीच्या संचालक पदावर निवड करण्यात आली होती. या दोघांनी कंपनीत प्रामाणिक काम करत असल्याचे भासवून रावल यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांच्यावर कंपनीचे बँक व्यवहार, नोंदी तसेच महत्त्वाच्या कामांची जबाबदारी देण्यात आली होती. रामसुब्रमण्यम आणि माटा यांनी वैयक्तिक फायद्यासाठी नोंदवही तसेच बँकेच्या व्यवहारात खोट्या नोंदी करून तब्बल 21 कोटींची अफरातफर केली. त्यानंतर त्या दोघांनाही पदावरून काढून टाकण्यात आले. 2015 मध्ये ही माहिती रावल यांना समजताच त्यांनी कंपनीचे 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे लेखापरिक्षण केले. त्यामध्ये त्यांनी 2003 ते मार्च 2016 या बारा वर्षांच्या कालावधीत तब्बल 20 कोटी 46 लाख 29 हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक शेख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.