बियाणे घेतांना शेतकर्‍यांनी काळजी घ्या

0

भुसावळ । येत्या खरीप हंगामासाठी बियाणांची खरेदी करतांना शेतकर्‍यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. बियाणे, खते व किटकनाशके यांची योग्य दरात विक्री व्हावी यासाठी सनियंत्रण होत असून धडक मोहिम राबविण्याकरीता जिल्हास्तरावर 1 व तालुकास्तरावर 15 असे एकुण 16 भरारी पथके तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.

बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावती घ्या
येत्या खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करतांना शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी खालील उपाय सुचविले आहेत.बियाण्यांची गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्‍या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा. पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशिल जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमुद करावे. तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन, पिशवी, टँग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद /मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहुन घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा बियाणे, खते व किटकनाशके निविष्ठांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.