बियाणे विक्री दुकानांतून छापील किंमतीचे दरपत्रक गायब!

0

भुसावळ । खते व बियाण्याच्या छापील किंमती व प्रत्यक्ष शासकीय किमती यात काही प्रमाणात तफावत असल्याने कृषिसेवा केंद्रांनी दुकानाच्या दर्शनी भागात दरपत्रक लावून त्यावर उपलब्ध साठ्याची माहिती बंधनकारक आहे. मात्र बहुतांश कृषिसेवा केंद्रात दरपत्रक नसल्याचे दिसून आले. दरपत्रक न लावता, काही जणांकडून कृत्रिम टंचाई भासविली
जात असते.

बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची लगबग
सध्या खरीप हंगामाची तयारी असल्यामुळे खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

छापील किमती व शासकीय किमतीमध्ये तफावत
खते व बियाण्याच्या छापील किमती व शासकीय किमती यामध्ये थोडीफार तफावत असल्याने शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर संबंधित कृषिसेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासकीय किमतीचे दरपत्रक, उपलब्ध साठा, तक्रारपेटी ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाला धाब्यावर बसवून अनेक कृषिसेवा केंद्रांनी शेतकर्‍यांची लूट चालविली असल्याचे दिसून येते. कृषिसेवा केंद्रांची नियमित तपासणी करण्यासाठी भरारी पथकांचे गठन करण्याची आवश्यकता आहे.

गैर प्रकार रोखावे
पथकाद्वारे दैनंदिन साठा रजिस्टर, दरपत्रक, तक्रारपेटी आदींबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र अशी तपासणी नियमित होत नसल्याने संबंधित दुकानदारांचे चांगलेच फावले आहे. खताचा काळाबाजार, अवैध साठा, जादा दराने विक्री, लिंकिंग पध्दत आदी शेतकर्‍यांना भंडावून सोडणार्‍या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन व कृषी विभाग विविध उपाययोजना करीत मात्र त्याची अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येते. खताचा साठा व किमतीचे फलक लावण्याचे आदेश असतानाही फलक लावले जात नाही.