बिरसा मुंडा पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन

0

नंदुरबार। शहरातील नवापूर चौफुलीवर बसविण्यात आलेल्या आदिवासी क्रांतिविर बिरसामुंडा यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आदिवासींच्या संघटनांनी याच चौफुलीवर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे चारही बाजूने जाणार्या वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीवर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्यात आला आहे.सदर पुतळ्याची विटंबना झालेली आढळून आली होती .त्यामुळे आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन दि.3 जुलै रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते.

आदिवासी झाले बेघर
ब्रिटिशांनी 1878-79 मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्याकरीता आदिवासींनी न्यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.

आंदोलनामुळे वाहतूक ठप्प
दि.4 जुलै रोजी आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते नवापूर चौफुलीवर जमले. तेथे त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे नवापूर, साक्री आणि नंदुरबार शहरात येणारी सर्व वाहने थांबविण्यात आली होती.या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. सुरक्षेच्या दृष्टीने हा पुतळा सुरक्षीत स्थळी उभारावा, अशी मागणी संघटनांच्या पदाधिकार्यांनी याप्रसंगी मांडली. सगळ्या संघटनांनी याबाबत आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडावे, नगरपालिका आपल्या मागण्यांना पूर्ण करेल, असे आमदार रघुवंशी यांनी आश्‍वासन दिले.

आदिवासी जननायक बिरसा मुंडा
ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्काळावर मात करण्याकरिता आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांनी जनआंदोलन केले.सन 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्यांना जेरीस आणले. त्यांनी पारंपारिक शस्त्रांद्वारे म्हणजे धनुष्यबाण, भाले इत्यादींच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले.बिरसाच्या आंदोलनामुळेच इ.स.1900 मध्ये सरकारने छोटा नागपुर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले तसेच बिरसा मुंडा यांच्यामुळे मुंडा आदिवासी शिक्षण, खेळ, विज्ञान, राजकारण अशा अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी धेतली.