बिलवाडी येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहात

0

जळगाव – तालुक्यातील बिलवाडी येथे “आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस” साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून शाळेच्या मैदानावर “साक्षरता चिन्ह” तयार केले. तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे व पालकांनी उपक्रमाबद्दल शाळेचे अभिनंदन केले. उपशिक्षक संदिप पाटील यांनी प्रास्ताविक केले व साक्षरता दिवसाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
मुख्याध्यापक कैलास पवार यांनी साक्षरता दिनाचे महत्व सांगतांना म्हटले की, निरक्षर असलेल्या लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून ‘युनेस्को’च्या वतीने दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा केला जातो. जगभरातील शैक्षणिक अनुशेष दूर करण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. महिला व पुरुषांमध्ये समानता आणण्यात साक्षरतेचे महत्त्वाचे योगदान आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी साक्षरता एक मुख्य आधारशिला आहे. गेल्या काही काळात भारतातही साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे तसेच महाराष्ट्र राज्य देखील साक्षरतेत अग्रेसर होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केल्यास शाळा १०० टक्के प्रगत झाल्याचे चित्र आपणास दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपशिक्षिका नीता जोशी यांनी सूत्रसंचालन व प्रतिभा पेंढारे यांनी आभार मानले. पदवीधर शिक्षिका प्रतिभा वानखेडे,अर्चना पाटील,अर्चना गोसावी आदी उपस्थित होते.