जळगाव। तालुक्यातील बिलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ‘जागतिक क्षयरोग दिन’ साजरा करण्यात आला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्षयरोग या आराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागात ‘क्षयरोग’ या आजाराबाबत मार्गदर्शन व्हावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने येथील उपक्रमशील शिक्षक संदीप पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. आजही ग्रामीण भागात ‘क्षयरोगाबद्दल’ पुरेशी माहिती नसल्याने नागरीक क्षयरोगाचे शिकार होतात. ग्रामस्थांना या रोगाची माहिती व्हावी. यासाठी वर्गातील विद्यार्थ्यांना क्षयरोगाबद्दल माहिती देण्यात आली.
क्षयरोग होण्याची कारणे, क्षयरोग झाल्याची लक्षणे, क्षयरोग झाल्यावर उपाययोजना व क्षयरोग होवू नये. यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंबधी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. क्षयरोग हा आजार संपविण्यासाठी ‘सर्वजण मिळून ही बी संपवूया’ हे घोषवाक्य ठरविण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. बिर्हाडे यांनी आयोजनकांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘क्षयरोग’ संपविण्याबाबत प्रतिज्ञा देखील घेतली व पालकांना क्षयरोगाबाबत माहिती सांगून जनजागृती करणार असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर शिक्षक महेंद्र पाटील होते. प्रभारी मुख्याध्यापक सुकदेव पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.