उपशिक्षक संदिप पाटील यांचा उपक्रम
बिलवाडी- जळगाव तालुक्यातील बिलवाडी जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिक बंदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदिप पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी एलईडी टिव्ही वर प्लास्टिकचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. सर्वांनी प्लास्टिक बंदीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्लास्टीक बंदीचा स्वीकार करावा
प्लास्टीकचा शोध 19 व्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क मध्ये लागला आणि काही दशकांमध्येच प्लॅस्टीकचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात होऊ लागला. प्लास्टीकचे अनेक गंभीर दुष्परिणाम आज समोर आलेले आहेत, त्यामुळेच शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली व आपण देखील प्लास्टिक चा वापर बंद करायला पाहिजे, प्लास्टिकच्या अतिरेकी वापराने प्रदूषणात दिवसेंदिवस भयंकर वाढ होत असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. बहुतांश वेळा जवळपास सर्व कचरा फेकून दिला जातो. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, प्लास्टिकचे पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या उपक्रमाला मुख्याध्यापक कैलास पवार व शिक्षकांचे सहकार्य मिळाले. तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिर्हाडे, केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे, शाळा व्यवस्थापन सदस्य व पालकांनी उपक्रमाबद्दल संदिप पाटील यांचे कौतुक केले.