पुणे हादरले : खंडणीखोरीतून हत्या झाल्याचा संशय
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंद्रभाई जयसुखलाल शहा (वय 56) यांची दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन मारेकर्यांनी अगदी जवळून पाच गोळ्या घालून हत्या केली. शनिवारी रात्री उशिरा हा थरारक प्रकार प्रभात रोडवर गल्ली क्रमांक सातमधील सायली अपार्टमेंटमध्ये घडला. शहा हे येथेच रहायला आहेत. दुचाकीवर आलेल्या मारेकर्यांनी शहा यांना घरातून बोलावून घेतले व काही कळायच्याआत त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. देवेंद्रभाई यांच्यासोबत त्यांचा 29 वर्षीय मुलगाही होती. परंतु, मारेकर्यांनी मुलावर गोळीबार केला नाही. गोळीबाराचा आवाज ऐकून शहा यांच्या पत्नी व शेजारी धावत खाली आले, त्यांनी तातडीने शहा यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, एक गोळी कमरेत व एक छातीत लागल्याने अतिरक्तस्त्रावाने त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. अत्यंत उच्चभ्रू वसाहतीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. डेक्कन पोलिसांनी रात्री अज्ञात मारेकर्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही हत्या खंडणीखोरीतून झाल्याचा संशय पोलिसांना असून, काही दिवसांपूर्वी त्यांना तशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या, अशी माहितीही वरिष्ठस्तरीय पोलिस सूत्राने दिली आहे. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून, त्यात मारेकरी आढळून येत आहेत.
खंडणी किंवा जमिनीच्या व्यवहारातून हत्येचा संशय
अंबिका ग्रूप ऑफ रियल इस्टेट नावाच्या कंपनीचे अध्यक्ष व बिल्डर असलेले देवेंद्रभाई शहा हे प्रभात रोडवरील सायली अपार्टमेंटमध्ये पत्नी, मुलासह राहतात. ते मुळचे मुंबईचे असून, व्यावसायानिमित्त पुण्यात स्थायीक झालेले आहेत. जमीन खरेदी-विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. तसेच, ते अलिकडे बांधकाम क्षेत्रातही उतरले होते. गेल्या 14 वर्षांपासून ते पुण्यात व्यवसाय करत आहेत. शनिवारी रात्री देवेंद्रभाई हे घरीच होते. साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकर्यांनी अपार्टमेंटमधील इस्त्रीच्या दुकानदाराला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, देवेंद्रभाईंना खाली बोलाविण्यास सांगितले. दुकानदाराने हा प्रकार त्यांना सांगितला, हे ऐकून देवेंद्रभाई हे मुलासोबत लिफ्टद्वारे खाली उतरले. त्यावेळी अचानक दुचाकीवरील मारेकर्याने त्यांना अगदी जवळून पाच गोळ्या घातल्या. एक गोळी कमरेत तर एक गोळी छातीत लागल्याने ते खाली कोसळले. गोळीबाराचा आज ऐकूण देवेंद्रभाईंच्या पत्नी व शेजारीही खाली आले, असता त्यांनी रक्ताच्या थारोळ्यातील देवेंद्रभाईंना तातडीने पुना हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र अतिरक्तस्त्राव व हृदयक्रिया बंद पडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा संपूर्ण परिसर उच्चभ्रू असून, सीसीटीव्हीच्या निगरानी खाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून, त्यात दोन मारेकरी दिसून येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. खंडणी किंवा जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहेत.
डेक्कन पोलिसांकडून कसून चौकशी सुरु!
एसीपी सेनगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकर्यांनी आपल्या तोंडाला स्कार्फ गुंडाळलेला नव्हता. त्यामुळे त्यांची लवकरच ओळख पटेल. तसेच, शहा यांच्या मुलाने आपल्या वडिलांचे कुणाशीही शत्रूत्व नव्हते, अशी माहिती दिली आहे. डेक्कन जीमखाना पोलिसांनी खुनाचे गुन्हे दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, शहा यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. शहा यांचे कार्यालय प्रभात रोडवरीलच कमला नेहरु पार्कमध्ये असून, त्यांचे निवासस्थान भांडारकर रोड व प्रभात रोडला जोडणार्या मार्गावर सायली अपार्टमेंटमध्ये आहे. त्यांना कुणाची धमकी मिळाली होती, याचाही तपास पोलिस करत आहेत. यापूर्वी जूनमध्येही पिंपळे गुरव बसस्थानकानजीक तुळजाभवानी मंदिराजवळ एका 40 वर्षीय बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाला होता. त्या घटनेतील दोन मारेकरही असेच दुचाकीवर आले होते. त्या गोळीबारप्रकरणी माजी नगरसेवकाच्या 23 वर्षीय मुलीला पोलिसांनी अटक केली होती व नंतर मारेकरीही पकडले गेले होते. त्यामुळे आता देवेंद्रभाई शहा यांच्या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.