मुंबई । स्टायकर बिशर पारिखने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर सेंट लॉरेन्स श्री मॉ विद्यालयाचा 3-0 असा पराभव करत बंगाल क्लब आयोजित 16 वर्ष गटाच्या मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. डावातील 40 व्या मिनीटाला पहिला गोल केल्यावर बिशरने अवघ्या 7 मिनीटांमध्ये हॅटट्रिक साधत संघाला उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करून दिला.
अन्य लढतीत अथर्व रेवालच्या दोन गोलांमुळे सेंट पॉल स्कूलने एस.एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलचा 3-0 असा पराभव केला. कॉर्नेलिस रॉड्रिक्झने 20 व्या मिनीटाला गोल करत सेंट पॉल संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अथर्वने 30 व्या आणि लगेचच 33 व्या मिनीटाला गोल करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. आणखी एका लढतीत स्केअर्ड हार्ट स्कूलने सेव्हंथ डे एवांगलीस्ट स्कूलचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात जेत्या संघासाठी उत्कर्ष बगोरिआ, केन सिमोस, प्रशांत मिरकर, फैसल खानने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाचा एकमेव गोल माझ अन्सारीने केला.