पटना: बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. अद्याप निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. मात्र अप्रत्यक्षरित्या प्रचाराला सुरुवात देखील झाले आहे. सर्व पक्षांनी आपली राजकीय तयारी सुरु केली आहे. दरम्यान बिहार विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष जेडीयू नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहे. भाजपा प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठक पार पडली. यातही घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल (जदयू) व लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली.
भाजपा, जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी एकत्रित आले आहेत, आपला विजय आहेच, केवळ औपचारिक घोषणा शिल्लक राहिल्याचा विश्वास जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. भाजपाबरोबरच एनडीएतील सहकारी पक्ष असलेले जदयू आणि लोक जनशक्ती पार्टीचा देखील निवडणुकीत विजयी होतील. तसेच, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
बिहार व देशात विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला आहे. विरोधी पक्ष शिल्लक राहिलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोट्या-छोट्या बैठका आयोजित करून प्रचार सुरू करण्याचेही आवाहन केले. तसेच, घरोघरी जाऊन नितीश कुमार यांनी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यास देखील त्यांनी सांगितले.