राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव बहुचर्चित चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यावर शनिवारी तिसर्यांदा कारागृहात गेल्यापासून एकच प्रश्न विचारला जातो आहे. लालूंना अटक झाल्यामुळे बिहारच्या राजकारणावर काय परिणाम होणार? हा तो प्रश्न. लालूप्रसाद मागील काही वर्षांपासून काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) खंदे समर्थक राहीले आहेत आणि त्यांनी नेहमीच समोरुन भाजपला कडवा विरोध केला आहे. याआधीही दोन वेळा जेलची हवा खावून आल्यानंतर लालूप्रसाद यादव यांची राजकिय ताकद वाढली होती. पण यावेळी मात्र परिस्थीती बदललेली आहे. बिहारमध्ये नितीश आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) एकच विरोधक होता तो म्हणजे लालूप्रसाद यादव. पण आता लालूच जेलमध्ये गेल्यामुळे बिहारच्या राजकारणात एनडीएला आता विरोधकच राहीलेला नाही.
त्यामुळे मागील चुका टाळून जेडीयू आणि भाजप विरोधकांना सपंवण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत आणि आपला दबदबा वाढवण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे एनडीएच्या रणनितीकारांना उमगले असेलच. बिहारमध्ये काँग्रेसचा फारसा प्रभाव नाही. लालूप्रसाद यांना दोषी ठरवल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडने आरजेडीबरोबरची युती कायम राहणार असल्याचे जाहीर केले. पण खरी परिस्थिती अशी आहे की कठीण परिस्थितीत लालूप्रसाद यादव आणि आरजेडीला पाठबळ देता येईल एवढीही काँग्रेसची तिथे ताकद नाही. चारा घोटाळ्यात लालूप्रसाद दिर्घ काळ कारागृहात राहील्यास आरजेडीला होणारे नुकसान भरुन काढता येणार नाही याची जाणिव भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांना आहे. त्यामुळे जेडीयूच्या एका नेत्याने दिलेली प्रतिक्रीया बिहारचे राजकारण कुठल्या दिशेने जाऊ शकते याचा अंदाज बांधायला पुरेशी आहे. हा नेता म्हणाला की, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव विरोधकांचा चेहरा होता. आता लालूंच्या गैरहजेरीत दुसरा कोणी नितीश आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर टिकू शकणार नाही. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत एनडीएला त्याचा फायदा होईल अशी चिन्हे सध्या दिसत आहे. भाजपचा एक नेता म्हणाला की, याआधी जेव्हा लालूप्रसाद जेलमध्ये गेले तेव्हा नितीश आणि भाजप संक्रमणाच्या परिस्थितीतून वाटचाल करत होते त्यामुळे ती त्यांची गरज होती. पण आताही लालूंच्या सजेच्या बाबतीत भाजपने जास्त ताणायला नको कारण तेच भाजपवर बुमरँगही होऊ शकते. याशिवाय लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी आरजेडीची एकजुट ठेवली नाही तर त्यांचे काही वरिष्ठ नेते दुसरी वाट चोखाळू शकतात. दुसरीकडे लालूप्रसाद आत गेल्यामुळे आरजेडीच्या वरिष्ठ पातळीवर झटका बसला असला तरी त्याचा राजकिय फायदा त्यांना मिळू शकतो. लालूप्रसाद यांची अटक बिहारमधील अतीमागासवर्गीयांशी केलेला भेदभाव आहे असे चित्र आरजेडी उभे करु शकते. 14 जानेवारीपासून तेजस्वी यादव राज्याचा दौरा करणार आहेत. या दौर्यात लालूप्रसाद यांना जेलमध्ये पाठवल्यानंतर त्याचा फायदा उचलण्याचा, सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न तेजस्वी करणार हे निशिचत आहे. यादव आणि मुस्लिम समुदायाव्यतिरीक्त इतरांना आपल्याकडे खेचून घेण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल. लालूप्रसाद यांच्या सुटकेसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते 2019 च्या निवडणुकीसाठी बाहेर येतील याची खात्री नाही. 3 जानेवारी सजा सुनावल्यानंतर लगेचच लालूप्रसाद यांच्या जामिनासाठी अर्ज देण्यात येणार आहे. परंतु याच प्रकरणातील आणखी चार तक्रारींवर निकाल अजून प्रलंबित आहे. जर या प्रकरणांमध्येही लालू दोषी ठरल्यास त्यांना प्रत्येक प्रकरणासाठी वेगवेगळा जामीन अर्ज द्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत आगामी लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी त्यांना जामीन मिळणे खूपच कठिण आहे.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117