नवी दिल्ली । सुकमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारच्या एका जवानाला दिलेला धनादेश बाऊन्स झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकाराने संताप व्यक्त होतोय. बिहार सरकारने हा चेक दिला होता. रंजीतकुमार असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून ते सुकमा येथील नक्षली हल्ल्यात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना बिहार सरकारने 5 लाख रुपयांची मदत दिली होती. मात्र, शहिदाच्या पत्नीला देण्यात आलेला 5 लाखांचा चेक बाउंस झाल्याने बिहार सरकारने पुन्हा एकदा शहिदांची थट्ट केल्याचे उघड झाले आहे.
सुकमा हल्ल्याप्रकरणी यापूर्वीही बिहार सरकारवर टीका करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सुकमा येथील हल्ल्यात बिहारचे सहा जवान हुतात्मा झाले होते. परंतु, बिहार सरकारमधील एकही मंत्री जवानांच्या घरी गेले नव्हते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये राग व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आता चेक बाउंस झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रंजीतकुमार शेखपुरा येथील रहिवासी होते. रंजीतकुमार सुमका येथील नक्षली हल्ल्यात शहीद झाले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी सरितादेवींनी पाच लाख रुपयांचा धनादेश सरकारने दिला होता. सरितादेवींनी तो चेक एचडीएफसी बँकेच्या शेखपुरा शाखेत जमा केला होता. परंतु, तो चेक वटण्याऐवजी जमुई, पाटणा आणि नोएडाच्या बँकेत फिरत राहिला. रंजीतकुमार यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या धनादेशावरील स्वाक्षरीमध्ये चूक झाली होती, असे शेखपुराचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले.