शिंदखेडा । तालूक्यातील शेतकरी देखील राज्यव्यापी संपात सहभागी झाले होते. संपाचे पडसाद शहरासह ग्रामीण भागातही पाहायला मिळाले. आठवडे बाजारात शेतक-यांनी कमी प्रमाणात भाजीपाला लिलावासाठी आणला होता. तसेच बी-बियाणे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून शेतकर्यांच्या संपाला पाठिंबा दिला. नेहमी प्रमाणे रोज सकाळी आठवडे बाजारात शेतकर्यांचा माल खरेदी करण्यासाठी एजंट यांची हजेरी होती. परंतू शेतकर्यांनी माल बाजारात विक्रीसाठी अतिशय कमी प्रमाणात आणला त्यामुळे असलेला मालखरेदी केला. गिर्हाईकांना जादा पैसे देवून भाजीपाला खरेदी करावा लागला. शिंदखेडा,दोंडाईचा,मालपूर भागात बि-बियाणे विक्रेत्यांनी दूकाने बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला आहे. या बाबतची सूचना प्रत्येक दूकानावर लावण्यात आली होती. कोणत्या विक्रेत्याची दुकान सुरू असल्याचे आढळल्यास त्या दुकानातील माल शेतकर्यांना मोफत वाटला जाईल असेही सूचनेत नमूद करण्यात आले होते.
दूध पूरवठ्यावर परीणाम : शेती सोबतच दूध विक्री करणे अनेक शेतकर्यांचा जोड धंदा आहे. नेहमी प्रमाणे सकाळीच दूध पोहचविण्यासाठी येणारे दूध विक्रेते शेतकरी आलेच नाहीत. चहा विक्री दूकाने देखील बंद होती. शहरासह तालूक्यातील विवीध दूध संकलन केद्रांवर दूध संकलीत होवू शकले नाही.
संपाला अनोखा पाठिंबा : येथील अॅड.झेड.बी.मराठे हे शेतकरी कुटूंबातील असून शिंदखेडा कोर्टात वकिली व्यवसाय करतात. तालूक्यातील संपात सहभागी असणार्या शेतकर्यांवर गुन्हे दाखल झाल्यास अश्या शेतकर्यांच्या केसेस कोर्टात मोफत लढू. यासाठी लागणारी कोणतीही वकिलाची फि घेणार नसल्याचे सांगून मराठे यांनी शेतकर्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.
भाजपाने करून दाखविले : छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आत्तापर्यंत सत्तेवर असलेल्या कॉग्रेस पक्षाला जे जमले नाही असा चत्मकार भाजप सरकारने करून दाखविल्याची प्रतिक्रीया शेतकर्यांनी व्यक्त केली .देशात फक्त शेतकरीच संपावर जाणे बाकी होते ते देखील भाजपाच्या सत्ता काळात घडले. इंग्रजांनी भारतीय रयतेचा अतोनात छळ केला ,परंतू शेतकर्याला त्याकाळी देखील संपावर जाण्याची वेळ आली नाही. मात्र भाजप शासनाने शेतकर्यांना संपावर जाणे भाग पाडले अशी जळजळीत प्रतिक्रीया शेतकर्यांनी दै.जनशक्तिशी बोलतांना व्यक्त केली.