मुंबई । मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभागातील आग्रीपाडा येथील जीर्ण झालेल्या चाळ क्र. 1 ते 4 पर्यंतच्या चाळी तोडण्याचा अजब सल्ला पालिकेनेच नियुक्त केलेल्या संरचनात्मक सल्लागारांनी रहिवाशांना दिल्याचे पालिकेने मान्य केले आहे. पण रहिवाशांनी पालिकेच्या सल्लागारांचा ‘सल्ला’ धुडकावून लावत स्वखर्चाने खासगी सल्लागारांकडून सल्ला मागितला असता, त्यांनी ही इमारत दुरुस्त योग्य आहे, असे नमूद केले. अखेर पालिकेनेही ‘स्पेस डिझाइन’ या सल्लागारांची नेमणूक केली असता, त्यांनीदेखील चाळींच्या दुरुस्त्या करण्याचे प्रस्ताविले आहे. या चाळी तळमजला अधिक 2 मजल्यांच्या आहेत.
चाळींचे संरचनात्मक परीक्षण
आग्रीपााड्यातील जीर्ण झालेल्या चाळ क्र. 1 ते 4 या चाळींच्या संरचनात्मक आणि स्थापत्य दुरुस्तीकरीता संरचनात्मक परीक्षण मालमत्ता विभागामार्फत ‘मे.दीपक कुलकर्णी’ यांच्याकडून करून घेण्यात आले. कुलकर्णी यांनी त्यांच्या अहवालात ही इमारत तोडण्याचे प्रस्ताविले. तरीही रहिवाशांनी कुलकर्णी यांनी दिलेला सल्ला धुडकावून स्वखर्चाने चाळ क्र.1 साठी ‘मे. राजे कन्सलटंट’ आणि चाळ क्र. 2/3 व 4 साठी’ मे. आर.ए. नाबर या संरचनात्मक सल्लागारांची नेमणूक केली. विशेष म्हणजे, या दोन्ही सल्लागारांनी त्यांच्या संरचनात्मक परीक्षण अहवालात या इमारती दुरुस्तीसाठी योग्य आहेत, असे नमूद केले.
सल्लागार समितीने तयार केला अहवाल
पालिकेने नियुक्त केलेल्या आणि रहिवाशांनी नेमणूक केलेल्या सल्लागारांच्या अहवालात मतभेद आढळल्यामुळे ही बाब मालमत्ता विभागामार्फत तांत्रिक सल्लागार समितीकडे (टॅक-टेक्निकल डव्हायझरी कमिटी) पाठवण्यात आली. या समितीने 4 चाळींची पाहणी करून अहवाल तयार केला तसेच अहवालात समितीने या चाळी दुरुस्तीसाठी योग्य आहेत, असे स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेच्या इमारत परीरक्षण विभागाने ’मे. आर. ए. नाबर आणि मे. राजे कन्सल्टंट’ यांना संरचनात्मक दुरुस्तीचे अंदाजपत्रक देण्यासाठी पत्रव्यवहार केला. राजे यांनी वेळेअभावी संरचनात्मक अंदाजपत्रके देऊ शकत नाही, असे सांगितले. पण मे. आर. ए. नाबर आणि मे. नाबर हे पालिकेच्या सल्लागारांच्या तालिकेत नसल्यामुळे त्यांच्याकडून या कामांची अंदाजपत्रके महापालिकेने घेतली नाहीत. या बाबींमुळे मे. स्पेस डिझाइन यांची संरचनात्मक सल्लागार नेमणूक करणायत आली. आग्रीपाड्यातील 4 चाळींच्या पुढील दुरुस्त्या होणार. काँक्रिट कामे, मायक्रो काँक्रीट, जॅकेटिंग व पॉलिमर कामे करणे, स्वच्छतागृहे व त्याच्या छतांचे जलाभेदीकरण करणे, इमारतींच्या छतांवर कौले बसवणे, बाह्य व अंतर्गत (अंशिक) सिमेंट गिलावा आणि रंगकाम करणे या कामांसाठी 3 कोटी 85 लाख 63 हजार 390 रुपये खर्च येणार आहे.