पुणे । बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्या वाहनचालकांवर पुणे महानगरपरिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बीआरटी मार्गांवर 47 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ‘बीआरटी’ मार्गावर अनेक खासगी वाहनचालक घुसखोरी करतात. त्यामुळे पीएमपी बसला अडथळा होण्याबरोबरच काही अपघातही झाले आहेत. यापार्श्वभूमीवर पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गावरील घुसखोर वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील आठवड्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ‘पीएमपी’चा सुरक्षा विभाग व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही ही कारवाई करण्यात आली.नगर मार्गावर शास्त्रीनगर येथे 25 चारचाकी तर 10 दुचाकी अशी 35 वाहने तर वाकड येथील किवळे मार्गावरही 8 चारचाकी व 4 दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहने जप्त केली जातील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दोन्ही मार्गावर एकही वाहन जप्त करण्यात आले नाही. वाहनचालक घुसखोरी करत राहिल्यास मग वाहन जप्तीची कारवाई करावी लागेल, असे पीएमपीच्या अधिकार्यांनी सांगितले. शहरातील सर्व बीआरटी मार्गात फलक लावण्याचे काम चालू आहे. बीआरटी मार्गात प्रवेश केल्यास वाहने जप्त करण्यात येऊन वाहनाचा लिलाव करण्यात येईल तसेच वाहनमालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे फलकांवर नमूद करण्यात आले आहे.