पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएलएल) जलद बस सेवेसाठी राखीव असलेल्या बीआरटी बस मार्गावर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत आहे. अशा वाहनांना अटकाव करण्यासाठी त्या वाहनांना जप्त करण्यात येवून विक्री करण्यात येईल, असा इशारा तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिला होता. मात्र त्यांच्या बदली नंतर प्रशासनाचा वचक कमी झाल्याने खासगी वाहनांची घुसखोरी वाढली आहे. घुसखोरी सुरु असल्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.
शहरातील नागरिकांना जलद गतीने प्रवास व्हावा म्हणून बीआरटी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. बीआरटीच्या रस्त्यावरुन फक्त पीएमपीच्या बस आणि रुग्णवाहिकाच धावू शकतात. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून खासगी वाहन चालकांनी बीआरटी मार्गावरुनच गाड्या दामटायला सुरवात केल्याचे चित्र सर्व शहरात दिसत आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सांगवी फाटा ते किवळे-मुकाई चौक या बीआरटी मार्गावर 118 बस धावत असून त्यांच्या 17 वेगळ्या मार्गावर बाराशे 28 फेर्या होतात. तर दुसरा नाशिकफाटा ते वाकड या मार्गावर 15 बस दोन वेगवेगळ्या मार्गावर धावतात. त्यांच्या 180 फेर्या दररोज होतात. साईड रस्त्यांवरील होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे खासगी चारचाकी वाहने सर्रास बीआरटी राखीव मार्गावरुन धावतात. त्यामुळे अपघात होण्याची भिती आहे.