बीआरटी मार्गावरील कामे निकृष्ट

0

70 कोटींचा चुराडा : दीड वर्षांनंतरही कामे अपूर्णच

पुणे : स्वारगेट ते कात्रज या सातारा रस्त्यावरील ’बीआरटी’वर गेल्या दीड वर्षांत 70 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही फूटपाथ वगळता फारशी कामे झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या बीआरटी मार्गाच्या पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोपही करण्यात आला. अर्धवट रखडलेल्या बीआरटी मार्गासाठी नव्याने 28 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून, ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गावरील विकास कामांची तपासणी करण्याच्या सूचनाही सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केली.

बीआरटी मार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेले नाही. भिमाले यांनी गेल्या वर्षी जून महिन्यांत केलेल्या भेटीमध्ये या मार्गावरील कामांबाबत असलेल्या तक्रारी अद्याप कायम असल्याचे समोर आले आहे. भिमाले यांच्यासह स्थानिक नगरसेवक प्रवीण चोरबोले, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पीएमपीच्या अध्यक्ष नयना गुंडे, पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. लक्ष्मी नारायण चौक ते कात्रज या संपूर्ण मार्गाची पाहणी यावेळी करण्यात आली. निंबाळकर यांनी गेल्याच आठवड्यात या मार्गाची पाहणी केली होती.

विकासकामांची चौकशी करण्यासाठी बैठक

स्वारगेट परिसरातील स्वारगेट (जेधे चौक) ते कात्रज स्थानक या 6.2 किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात दिरंगाई होत असून, त्याबाबत नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या मार्गावर पूर्वी बसथांबे मार्गाच्या कडेला होते. त्यातून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या मार्गावर निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली असून, ही सर्व कामे ठेकेदाराकडून नव्याने करवून घेण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. त्यावर सभागृह नेते भिमाले यांनी या मार्गावर झालेली कामे, खर्च करण्यात आलेला निधी आदींच्या चौकशीची सूचना केली. त्यानुसार येत्या दोन-चार दिवसांत निंबाळकर येथील विकासकामांची चौकशी करण्यासाठी बैठक आयोजित करणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.