दरवर्षी सुमारे दीड कोटींचे उत्पन्न मिळणार
पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधून जाणार्या सर्व बीआरटी बसस्थानकांवर जाहिरात होर्डिंग उभारण्यात येणार आहेत. पीएमपी प्रशासनाकडून एका खासगी एजन्सीला हे काम देण्यात आले असून या माध्यमातून दरवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागणार्या पीएमपीच्या उत्पन्नवाढीला हातभार लागणार आहे, अशी माहिती पीएमपी अधिकार्यांकडून देण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बीआरटीचे आठ मार्ग आहेत. त्यामध्ये येरवडा-वाघोली, संगमवाडी-विश्रांतवाडी, औंध-रावेत, नाशिक फाटा-वाकड, निगडी-दापोडी, काळेवाडी फाटा आदी मार्गांचा समावेश आहे. दोन्ही शहरांमधून हे मार्ग जात असून ठिकठिकाणी बसथांबे उभारण्यात आले आहेत. संबंधित स्थानकावर जाहिराती करण्याबाबत पीएमपीचे पूर्वीपासूनचे धोरण असून बसवरही जाहिरातींसाठी परवानगी दिली जाते.
उत्पन्न मिळण्यासाठी एजन्सीला काही अटी
पीएमपीला जाहिरातींसह विविध मार्गाने मिळणारा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे संचालक मंडळानेही उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने बीआरटी मार्गांवरील बसथांब्याच्या शेडवर जाहिरात होर्डिंग उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. यानुसार काही ठिकाणच्या थांब्यावरील कामही पूर्ण झाले आहे. याठिकाणी लवकरच होर्डिंग उभारले जाणार आहेत. यामाध्यमातून पीएमपीला उत्पन्न मिळणार असून यासाठी एजन्सीला काही अटी घालण्यात आल्या आहेत.