आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याचाही तपास व्हावा ः कवडीमोल भावात मालमत्ता खरेदी करणार्यांवर कारवाई होणार का?
जळगाव: शहरातील एमआयडीसी परिसरात मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह संस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून छापे टाकण्यात आले. यात पाच संशयितांना अटक झाली, अवसायक जितेंद्र कंडारेसह, उद्योजक सुनील झंवर अद्याप फरार आहे. कंडारेच्या माध्यमातून कवडीमोल भावात बीएचआरच्या मालमत्ता विक्री करण्यात आल्या. सोमवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी या मालमत्ता खरेदी करणार्यांची यादी दिली. सुनील झंवर यांच्या साई मार्केटींग अॅण्ड ट्रेडींग कंपनीच्या नावाने निविदा भरुन मालमत्ता खरेदी करण्यात आल्या असल्योच दिसून येत आहे. मात्र इतर मालमत्ता खरेदी करणारे व सुनील झंवर यांच्यात काही कनेक्शन आहे का? केवळ निविदा भरण्यासाठी माणसांना उभे करुन त्यांच्या नावाने इतरांनी या मालमत्ता हडपल्या का? असाही प्रश्न आता उपस्थित होत असून त्या दृष्टीने पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास व्हावा, असा सूरही व्यक्त होत आहे.
राज्यभरातील याठिकाणच्या मालमत्ताची विक्री
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी बीएचआरमधील घोटाळ्याप्रकरणात मालमत्ता खरेदी करणार्यांसह, कुणाचे नावे, निविदा काढली, कुणी या मालमत्ता खरेदी केली. याबाबतची कागदपत्रे माध्यमांच्या प्रतिनिधींना उपलब्ध केली. बीएचआर संस्थेच्या नऊ राज्यांमध्ये शाखा आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही बीएचआर संस्थेची मालमत्ता आहे. यात जळगाव शहरासह, जिल्ह्यात अमळनेर, बोदवड, टोणगाव ता.भडगाव, शेंदुर्णी ता.जामनेर, फत्तेपूर ता.जामनेर, नशिराबाद, भुसावळ, तसेच पिंपळेगुरव, पुणे, निगडी, पुणे, आंबेगाव, पुणे, घोले रोड, पुणे, हवेली ता. पुणे, नागपूर, फलटन ता. सातारा, नाशिक, लातून, बारामती, बुलढाणा येथील बीएचआरच्या संस्थेच्या मालमत्ता विक्री झाल्याचा खडसेंनी दिलेल्या कागदपत्रात समावेश आहे. यात काही ठिकाणच्या मालमत्तांची खरेदी झाली आहे. तर काही मालमत्तांची खरेदी बाकी असल्याचाही उल्लेख आहे.
झंवरच्या साई मार्केटींगच्या नावाने पुणे, नाशकातील मालमत्ता खरेदी
राज्यभरात बीएचआरच्या प्लॉटसह दुकाने या विक्री झाल्या आहेत. या मालमत्ता खरेदी करण्यासाठी काहींनी स्वारस्य म्हणजेच इच्छा दाखविली. यात निरंजन प्रविण कोठाडी, रा. पुणे, धिरज रामचंद्र सोनी रा. नवीपेठ, जळगाव, साई मार्केटींग अॅण्ड ट्रेडींग कंपनी, सुदेश भन्साली रा. खेडगाव पुणे, अब्दुल रहिम अब्दुल हक रा. शिवाजीनगर जळगाव, रोहित प्रविण कोठाडी रा. पुणे, जितेंद्र हातेड रा शिवाजीनगर पुणे, योगेश रामचंद्र लढ्ढा रा. पाळधी ता.धरणगाव, साई सेवा नागरी सहकारी पतपेढी, पुणे, मधुकर बनकर रा. शिवाजीनगर पुणे, प्रशांत महामुनगर रा. प्रभात कॉलनी, महाड जि.रायगड, नारायण भल्ला रा. अकोला, आकाश माहेश्वरी अमळनेर, कैलास धुत, बिबवेवाडी, पुणे, राजकुमार अजमेरा रा. उस्मानाबाद , अलोक शिवानी रा. जळगाव, अनुपम कुलकर्णी पाली. जि. रायगड, संजय लाहोटी, पाटणी चौक, वाशिम, मयुर इंदाणी रा. नाशिक, केतन मालु, कृष्णा चौक सांगवी, पुणे, छगन विठ्ठलराव कोरडे मोहाडी रोड, जळगाव, स्व रामभाऊजी लिंगडे नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा, अरुण सोनार आशाबाब नगर, शिवकॉलनी या समावेश आहे.
यात एकनाथराव खडसेंनी दिलेल्या कागदपत्रानुसार सुनील झंवर यांच्या साई मार्केटींगच्या नावाने नशिराबाद येथील तीन दुकाने, निगडी येथील 3 दुकाने व प्लॉट, व घोले रोड पुणे येथील प्लॉट, नाशिक रोड आनंदप्लाझा येथील तीन दुकाने यासाठी निविदा भरण्यात आल्या. त्यापैकी नशिराबाद, नाशिक येथील खरेदी बाकी तर घोलेरोड पुणे व नाशिक येथील मालमत्तेची साई मार्केटींगच्या नावाने खरेदी झाली आहे. दरम्यान बीएचआरच्या संबंधित मालमत्ता खरेदी करणारे किंवा स्वारस्य दाखविणारे यांचे व सुनील झंवर यांच्यात काय कनेक्शन आहे. याचाही तपास यंत्रणांनी शोध घेणे महत्वाचे आहे. कवडीमोल भावात मालमत्ता घेणारे काही राजकीय पुढारी तसेच पुढार्यांचे जवळचे असल्याचीही शक्यता नाकारात येत नाही.
बीएचआरचा ब्लॅकचा पैसा विकासोंमधून व्हाईट
एकनाथराव खडसेंनी पत्रकार परिषदेत बीएचआरच्या मालमत्ता कवडीमोल भावात विक्री तसेच खरेदी झाल्याचे सांगितले. याबरोबरच बीएचआरचा ब्लॅकचा पैसा हा व्हाईट करण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक विकास सोसायट्या, पतसंस्थांच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आले. यात बीएचआरचा पैसा पतसंस्था, विकासोंमध्ये टाकून तो व्हाईट करुन हडपण्यात आला. त्यामुळे संबंधित विकास सोसायट्या, पतसंस्थांचाही पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, तसेच कारवाई करावी, असा सूर व्यक्त होत आहे.
अशी खरेदी केली कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल भावात
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने संशयितांना अटक केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळावी, यासाठी कारणे नमूद केली. यात पुणे येथील बालगंधर्व चौकातील मोक्याच्या जागी असलेले 5 दुकाने व एक फ्लॅट यांची केवळी 3 कोटी 11 लाखाला संशयितांनी विक्री केल्याचे भासविले. प्रत्यक्षात संबंधित एका फ्लॅटची किंमत अडीच ते तीन कोटी आहे. अशाप्रकार राज्यभरातील मालमत्तांची विक्री व खरेदी झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. विशेष म्हणजे संबंधित बनावट व्यवहार झाल्याबाबत संशयितांकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.