जळगाव- बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांचाही संशयित आरोपी म्हणून समावेश आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईप्रसंगी त्यांच्या विरुद्धही अटक वॉरंट निघाले होते. मात्र, ते या प्रकरणात फरार आहे, अशी माहिती पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.
या गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जळगाव, जामनेर, भुसावळ, औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकोला आणि पुणे येथे एकाच वेळी धाडसत्र राबवून 12 जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील संशयित 11 आरोपींनी अटक झाली. एका आरोपीच्या पतसंस्थेशी संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे त्यास अटक झालेली नाही. या कारवाई सत्राच्या वेळी आमदार चंदुलाल पटेल यांच्या विरुद्ध सुद्धा अटक वॉरट निघाले होते. परंतु, ते पोलिसांच्या हाती लागले
नाही. या वेळी सराफ आणि हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल उद्योजक प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व जळगाव), जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेंद्र लोढा (जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष आसीफ मुन्ना तेली, प्रीतेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) यांना अटक झाली आहे. संशयित आरोपींच्या जामीन अर्जावर पुण्यातील न्यायालयात सुनावणीचे कामकाज सुरू आहे.