जळगाव । बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी दुसर्या टप्प्यात एकाच दिवशी अटक झालेल्या 11 संशयित आरोपींचा जामीन अर्ज पुण्यातील न्यायालयाने बुधवारी मंजूर केला आहे. न्यायालयाने काही अटी, शर्तींवर जामीन अर्ज मंजूर केले.
या गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जामनेर, भुसावळ, जळगाव, पुणे, अकोला आदी ठिकाणी दुसर्या टप्प्यात धाडसत्र राबवून 11 संशयित आरोपींना अटक केली. या कारवाईत हॉटेल व सराफ व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल उद्योजक प्रेम कोगटा, जयश्री मणियार, संजय तोतला, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे, आसिफ मुन्ना तेली, जयश्री तोतला, प्रितेश जैन, अंबादास मानकापे आदींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झालेली होती. त्यानंतर न्यायालयाने बुधवारी सर्व 11 संशयित आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयान काही अटी, शर्तींंवर जामीन अर्ज मंजूर केला. संशयित आरोपीने आपल्याकडे पावत्या मॅच केल्याच्या रकमेच्या 20 टक्के रक्कम ही 10 दिवसांच्या आत भरायची आहे. प्रत्येक आरोपीला एक लाख रुपयांचा जातमुचलका भरावा लागेले. तसेच या प्रकरणातील पतसंस्थेचा तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे याच्याकडून पुण्यातील आर्थिक गुन्हा शाखेला चौकशीदरम्यान भक्कम पुराव्यालायक 25 फाइल्स हाती लागल्या आहेत. त्या दृष्टीने कसून तपास सुरू आहे.