बीएचआर घोटाळ्यातील रकमेतून माजी मंत्री महाजनांनी दहा कोटींची जमीन घेतली

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंचा खळबळजनक आरोप : म्हणाले मुलीच्या पराभवामागे महाजनांचा हात

मुक्ताईनगर : माजी महसूलमंत्री खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी ‘मास्तराच्या मुलाकडे बाराशे कोटी’ची प्रॉपर्टी कशी? असा आरोप माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता बोदवडमधील बैठकीत केला तर त्यानंतर महाजन यांनी ‘खडसेंचे मानसिक संतुलन ढळल्याने ते बेछूट आरोप करीत असून त्यांची कीव येते’ असे वक्तव्य माजी मंत्री महाजनांनी केले होते. दोघा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच तालुक्यातील जोंधनखेडा धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात रविवारी माजी मंत्री खडसे यांनी पुन्हा माजी मंत्री महाजनांवर टिकेची तोफ डागली आहे. आपल्याकडील प्रॉपर्टी बेहिशेबी निघाल्यास ती आपण महाजनांना दान करू मात्र महाजनांनी दहा कोटींची प्रॉपर्टी बीएचआर घोटाळ्यातील पैशातून कमावली असून त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचा खळबळजनक दावा केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच
खडसे याप्रसंगी म्हणाले की, मुलगी अ‍ॅड.रोहिणी खडसे हिच्या पराभवामागे माजी मंत्री गिरीश महाजन यांचाच हात असल्याचे आता स्पष्ट झाले असून ही बाब आपल्याला कालच समजली. मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असे आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना यावेळी केले.

महाजनांच्या प्रॉपर्टीचे आपल्याकडे उतारे
नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही 10 कोटींची जमीन खरेदी केली आहे व माझ्याकडे त्याचे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी यावेळी केला. मी तुमचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला त्यामुळेच यांचा जीव धकधक करत आहे. गरीबांच्या ठेवींवर यांनी दरोडे घातले आहेत, असे सांगून ते म्हणाले की, ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात माझ्याविषयीची चार्जशीट दाखल झाली आहे त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही.

फडणवीसांवरही टिका : म्हणाले गद्दार यु ट्यूबवर शोधा
यावेळी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. राष्ट्रवादीत आल्यानंतरच मला भाजपमधील गद्दार कोण हे समजलं आहे. मी चाळीस वर्ष जीवाची पर्वा न करता भाजपमध्ये काम केलं. त्याच गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला. हे गद्दार कोण आहेत हे एकदा गुगलवर सर्च करून पाहा. टरबूज असं सर्च करून पाहा, मग कळेल गद्दार कोण?, अशी टीका त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. दाऊत व दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध जोडले. माझं मंत्रीपद काढून घेण्यात आले, असा हल्लाबोलही त्यांनी फडणवीसांवर केला.