जळगाव :बीएचआरप्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत त्यांना जामीन मिळूून ते बाहेर येऊ शकतात. पण दुसरीकडे मुख्य संशयित अजूनही फरार आहेत. अशा स्थितीत संशयितांना जामीन मिळू नये म्हणून ठेवीदार त्रयस्थ अर्जदार होऊ शकतात. त्यासाठी ठेवीदारांना एका पानाचे प्रतिज्ञापत्र वकिलांमार्फत न्यायालयात सादर करावे लागेल.
एमपीडीएचे कलम लागलेल्या गंभीर प्रकरणात फरार दोन म्होरके जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत इतर संशयितांनी बाहेर येणे हे ठेवीदारांसाठी हितावह ठरू शकते का ? याचा निर्णय स्वतः ठेवीदारांनाच घ्यावा लागणार आहे, असेही कायदा अभ्यासकांचे मत आहे.
पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास आहे. त्यांनी आतापर्यंत सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांखला (40, रा. शिव कॉलनी), महावीर मानकचंद जैन (37 , रा.गुड्डूराजा नगर), ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (45, रा. देवेंद्र नगर) सुजीत सुभाष बाविस्कर (वय 42, रा.पिंप्राळा) व कंडारेचा वाहनचालक कमलाकर भिकाजी कोळी (28, रा. के. सी. पार्कमागे, जळगाव) या पाच जणांना ताब्यात घेतले असून, ते सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत आहेत. परंतु, प्रमुख संशयितांपैकी अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवर हे अद्यापही फरार आहेत.