मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मुंबई महापालिकेकडून आज कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. अनधिकृत असल्याचे सांगत तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात भाजपने कंगना रानौतची बाजू घेतली आहे. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई सुडबुद्धीने करण्याता आली असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मुंबईत असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी उद्यापासून रोज मुंबई महानगरपालिकेला पाठवणार असून, त्यावर २४ तासांत कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
भाजपने कंगना रानौतच्या मुंबईबाबत केलेल्या विधानाचे निषेध केले आहे. त्याचे समर्थन केलेले नाही. मात्र कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई ही सुडबुद्धीने करण्यात आली आहे, असे आरोप केले आहे. कंगनाचे कार्यालय जर अनधिकृत होते तर इतके दिवस का कारवाई केली नाही? असा सवालही शेलार यांनी केला आहे.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व परिसरामध्येही अनेक अनधिकृत बांधकामी आहेत. मात्र महानगरपालिकेने कधी एवढ्या तत्परतेने कारवाई केली नव्हती, आता मुंबईत असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी उद्यापासून रोज मुंबई महानगरपालिकेला पाठवणार असून, त्यावर २४ तासांत कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे आशिष शेलार यांनी सांगितले.