बीएसईएस सोसायटीतील चिमू गायब

0

मुंबई – बोरिवली पश्चिम बीएसईएस सोसायटीतील चिमू हरवल्याची तक्रार पॉज संस्थेकडे आली आणि तिच्या शोधासाठी धावाधाव सुरू झाली. पण चिमू नेमकी आहे तरी कोण? चिमू ही या सोसायटीतील एक श्वान असून ती काही दिवसांपासून बेपत्ता आहे. याबाबत सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिमुरड्यांची माणुसकी; सुरक्षारक्षक वैरी
बोरिवली पश्चिम येथील एलटीडी रोड, बीएसईएस सोसायटी, प्लॉट नंबर 4 याठिकाणी एक भटकी कुत्री गेल्या 7 महिन्यापासून राहत होती. सोसायटीच्या मुलांची तिच्यासोबत चांगलीच मैत्री झाली होती. त्यांनी तिचे चिमू असे नामकरणदेखील केले होते. विशेष म्हणजे, सोसायटीतील सर्व मुलांनी मिळून “एसएस पार्टी बडीज्’ असा “अॅनिमल लव्हर’चा ग्रुप तयार करुन या चिमूची नसबंदी व लसीकरण केले होते. या मुलांनी पालिकेकडून चिमूला सोसायटीमध्येच ठेवण्याचे लायसन्सदेखील मिळवले होते. मात्र, बीएसईएस सोसायटीमधील काही रहिवाशांना चिमू सोसायटीत राहत असल्याचे आवडत नव्हते. त्यामुळे सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने या चिमूला जबरदस्तीने काही दिवसांपासून सोसायटीच्या गेट बाहेर बांधून ठेवले होते. ती तशीच बांधलेल्या अवस्थेत पावसात भिजत होती. यामुळे ती आजारी पडली, त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. 22 जुलै रोजी रात्री साधारण 11.30 वाजता सोसायटीतील लोकांनी सुरक्षारक्षक पदम परिहार याने चिमूला गेटच्या बाहेर बांधून ठेवल्याचे पाहिले होते. त्याच्या दुसर्‍या दिवसापासूनत म्हणजे 23 जुलैपासून चिमू सोसायटी परिसरातून गायब झाली आहे. पुष्पांजली बाचरे यांनी मेल द्वारे प्लाण्ट एण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीकडे याबाबत तक्रार केली होती.

सुरक्षारक्षकाविरोधात तक्रार दाखल
सुरक्षा रक्षक पदम याने जबरदस्तीने बांधून ठेऊन पावसात भिजल्यानेच चिमू आजारी पडली आणि दुसर्‍या दिवसापासून ती परिसरातच दिसून आलेली नाही. तेव्हा सुरक्षारक्षकच चिमूला शारीरिक त्रास देऊन तिला आजारी पाडण्यास कारणीभूत असल्याची तक्रार पॉज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनीष सुब्रमण्यन कुंजू यांनी बोरिवली पश्चिम पोलिस स्थानकात केली आहे. त्यानुसार, सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिमूला शोधणार्‍यास बक्षीस
सुनीष सुब्रमण्यन यांनी नागरिकांनी आवाहन केले आहे की, ही चिमू कुठे निदर्शनास आली तर 9833480388 या क्रमांकावर संपर्क साधावा. चिमूला शोधण्यास मदत करणाऱ्यांना संस्थेमार्फत बक्षीस देण्यात येणार आहे.