नवी दिल्ली। रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन, युनीनॉर आदी खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये अगोदरच जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतच आता बीएसएनएल या एकमेव असलेल्या सरकारी कंपनीनेही उडी घेतली आहे. खासगी कंपन्यांच्या आक्रमक ऑफर आणि प्रचार पद्धतीला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने थेट ट्रिपल एस प्लान लाँच केला आहे.
या ऑफरनुसार 333 रुपयांपासून ते 395 पर्यंतचे तीन नवे प्लान ग्राहकाच्या दिमतीला हजर असणार आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारख्या सुविधा मिळणार आहेत. बीएसएनएलने ही ऑफर जरी लाँच केली असली तरी, त्यात एक मूलभूत फरक आहे. एअरटेल, जिओ, आयडिया आणि व्होडाफोन त्यांच्या प्लानमधून 4 जी डाटा देत आहेत. तर, बीएसएनएल ग्राहकांना हायस्पीड 3 जी डाटा देणार आहे.
बीएसएनएलही स्पर्धेत उतरली
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात दोन गटांत विभागले आहे. एक सरकारी आणि दुसरे खासगी. पहिल्या भागात बीएसएनएल ही एकमेव सरकारी कंपनी आहे, तर दुसर्या बाजूला रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन, युनीनॉर, आयडीया यांसारख्या सर्वच खासगी कंपन्या आहेत.
या खासगी कंपन्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी एकमेकांसोबत जोरदार स्पर्धा करत आहे. मात्र, ही स्पर्धा करत असताना बीएसएनएल या सरकारी कंपनीची भारतातील व्याप्तीही लक्षात ठेवून आहेत. त्यामुळे स्वत:सोबत स्पर्धा करता करताच ही या कंपन्या बीएसएनएलसोबतही स्पर्धा करतात. अर्थात, बीएसएनएल ही सरकारी कंपनी असल्याने खासगी कंपनीच्या स्पर्धेवर फार लक्ष देत नाही. अलीकडील काळात खासगी कंपन्यांनी स्वस्तातले प्लान लाँच केल्यामुळे बीएसएनएललाही ग्राहकांचा विचार करता या स्पर्धेत उतरावे लागत आहे. या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल कासवगतीने का होईना, या स्पर्धेत उतरत आहे.
एस प्लॅनची वैशिष्ट्ये
ट्रिपल एस प्लान अंतर्गत ग्राहकांना 333 रुपयांत 90 दिवसांसाठी 3 जीबी 3 जी डाटा मिळणार आहे. याचा अर्थ कपंनी 333 रुपयांत 270 जीबी हायस्पीड 3 जी डाटा देणार आहे. अशा रितीने ग्राहकांना 1जीबी डाटा खर्च करण्यासाठी फक्त एक रुपया 23 पैसे द्यावे लागणा आहे. दिल खोल के बोल प्लानदेखील लाँच केला आहे. 349 रुपयांच्या या प्लानअंतर्गत ग्राहक अनलिमिटेड लोकल कॉल आणि एसटीडी कॉल करु शकणार आहेत. त्यांना दर दिवशी 2 जीबी 3 जी डाटा स्पीडवर मिळणार आहे. तिसरा प्लान 395 रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना बीएसएनएल नेटवर्कवर 3000 मिनिटे आणि इतर नेटवर्कवर 1800 मिनिटे फ्री मिळणार आहेत. सोबतच रोज 2 जीबी 3 जी डाटा वापरु शकणार आहेत.