बीएसएनएलची ‘4 जी’ सेवा का नाही?

0

‘मिशन राजीव’ काँग्रेसचा सवाल; कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

पुणे : इंटरनेटची ‘4 जी’ सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर आता देशभर उभे आहेत. सर्वांत प्रथम ‘3 जी’ सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने ‘4 जी’ सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याची टीका ‘मिशन राजीव’ काँग्रेसने केली.

ग्राहकांसाठी तातडीने ‘4 जी’ सेवा सुरू करावी या मागणीसाठी ‘मिशन राजीव’च्या वतीने बाजीराव रस्त्यावरील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संस्थापक व काँग्रेसचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, माजी आमदार मोहन जोशी, शिवा मंत्री, बाळासाहेब मारणे, राजेंद्र खराडे उपस्थित होते. एम्प्लोइज युनियन, नॅशनल फेडरेशन ऑफ टेली, ऑल इंडिया इंजिनिअर असोसिएशन यांनी पाठिंबा दिला.

तिवारी म्हणाले, कोट्यवधी ग्राहक ‘4 जी’ सेवेपासून वंचित आहे. यासाठी त्यांना खासगी कंपन्यांकडे जावे लागत असून यामधून मोठे नुकसान होत आहे. रिलायन्स कंपनीच्या जिओ व इतर खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. यामध्ये घोटाळा असून याची महालेखापालद्वारे चौकशी करण्यात यावी. यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवून सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.