नवी दिल्ली । दुचाकी आणि चार चाकी गाड्यांमधून होणार्या प्रदूषणाची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्वोच्च न्यायलयाने बुधवारी भारत स्टेज म्हणजे बीएस थ्रि इंजिन असलेल्या गाड्यांच्या विक्रीला मनाई करणारा आदेश दिला आहे. त्यामुळे आता 1 एप्रिल 2017 पासून बीएस थ्रि इंजिन असलेल्या गाड्यांची विक्री बंद होणार आहे, ज्या गाड्यांना भारत स्टेज बीएस थ्रीच्या निकषानुसार बनवण्यात आलेलं नाही, अशा गाड्यांची 1 एप्रिलनंतर विक्री होणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाचा हा निर्णय ऑटोमोबाईल कंपनीसाठी एक मोठा झटका मानला जातोय.
अनेक ऑटोमोबाइल कंपनीकडे गेल्या वर्षीचा मोठा स्टॉक शिल्लक आहे, त्यामुळे ऑटोमोबाइल कंपनीचं कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल कंपन्यांनी जुना स्टॉक विकण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायलयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ऑटोमोबाईल कंपन्यांना आधीपासूनच 1 एप्रिलची मुदत माहिती होती. तसंच लोकांचे आरोग्य हे जुन्या स्टॉकपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. भारतात सध्या 20 हजार ऑटोमोबाइल डीलर्स आहेत. त्यांच्याकडे 9 लाख युनिट इतका जुना स्टॉक शिल्लक आहे. त्याची किंमत 12 हजार कोटी रुपये आहे. एकट्या हिरो मोटो कॉर्प या कंपनीनं काही दिवसांपूर्वी दावा केला होता की जर बीएस थ्रिवर बंदी आणल्यास त्यांच्या समोर 1 हजार 600 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे.
केंद्र सरकारनं ऑटोमोबाईल कंपन्यांकडे शिल्लक असलेला स्टॉक विकू द्यावा या मागणीला समर्थन दिलं होतं. पण न्यायालयाने याकडेही दुर्लक्ष करत हा निर्णय दिला आहे.
– बीएस थ्रि इंजिन गाड्यांचा स्टॉक
दुचाकी – 6 लाख 71 हजार 308
तीन चाकी – 40 हजार 048
कार – 16 हजार 198