नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने भारत स्टेज म्हणजे बीएस-3 इंजिनच्या गाड्यांच्या विक्रीला प्रतिबंध घातला. त्यामुळे आता 1 एप्रिल 2017 पासून बीएस-3 इंजिन असलेल्या गाड्यांची विक्री बंद झाली आहे. ऑटोमोबाइल कंपन्यांकडे बीएस 3 इंजिन असलेल्या गाड्यांचा मोठा स्टॉक उपलब्ध आहेत. हा स्टॉक आता विकता येणार नसल्याने कंपन्यांचे सुमारे 2500 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. क्रिसिल या संस्थेने ही माहिती दिली आहे.
1 एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांची विक्री करता येणार नसल्याने 31 मार्चला ऑटोमोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना मोठी सूट दिली होती. ही सूट टू व्हीलरपासून सर्वच गाड्यांवर होती. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली, तर उरलेला मोठा स्टॉक आणखी शिल्लक आहे. ग्राहकांना मोठी सूट दिल्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान सोसावं लागले आहे, शिवाय आता जो स्टॉक उरला आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठीही मोठा खर्च येणार आहे. सूट दिल्यामुळे कंपन्यांना 1200 कोटींचं नुकसान झालं आहे, तर स्टॉकची विल्हेवाट लावण्यासाठी 1300 कोटींचा खर्च होणार आहे. त्यामुळे हा खर्च 2500 कोटींच्या घरात जाणार आहे.
बजाज ऑटो, यामाहा, आयशर मोर्टा यासारख्या कंपन्यांनी बीएस-4 अनुपालनासाठी आपली यंत्रसामग्री आधीच सज्ज ठेवली आहे. मात्र, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर्स, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया, या कंपन्यांकडे बीएस-3चा बराच माल अजूनही शिल्लक आहे. काही उरलेला माल हा ज्या देशांमध्ये नियम शिथिल असतील, त्या देशांना निर्यात होण्याची शक्यता आहे. अशोक लेलँड आणि टाटा मोटर्स या कंपन्या भारतात व्यापारी वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आहेत. विक्रीमंदीमुळे या वाहनांच्या वार्षिक उलाढालीला 2.5 टक्के फटका बसणार आहे.