बीओटी तत्वावरील वॉटरपार्क व सी.बी.गार्डनचे 25 रोजी लोकार्पण

0

नंदुरबार। शहरे स्मार्ट व्हावी यासाठी शासन स्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांपैकी स्मार्ट सिटी हा एक उपक्रम आहे. स्मार्ट शहराची निर्मिती करुन शहर सुंदर करण्यावर शासनाने भर दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत कामे करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही स्मार्ट सीटी निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नंदुरबार येथील नगर परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट सीटी निर्मिती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या सी.बी.गार्डन व वॉटरपार्कचा लोकार्पण सोहळा रविवारी 25 जून रोजी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. सकाळी 11 वाजता लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शहर सुशोभिकरण
शहरातील सर्वच रस्ते दर्जेदार बनविण्यात आले असून चौफुल्यांवर सुशोभिकरण करण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत नगरपरिषदेने विविध उपाय योजना केल्या असून त्याचेही चित्र नागरिकांना पाहायला मिळत आहे. यापुढे प्रत्येक घरात दोन उजबीन देण्यात येणार असून गल्लोगल्लीत कचरा घेण्यासाठी घंटागाडी जाईल. रस्ते सफाई करण्याकरीता मशिन मागविण्यात येणार आहे. या सार्‍या विकासकामांमुळे नंदुरबार शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे दहा शहरांच्या बरोबरीने स्मार्टसिटीचा लुट नंदुरबार शहरात पाहावयास मिळणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.

मुबलक पाणी पुरवठा
राज्यात सर्वत्र भिषण पाणीटंचाई जाणवली. मात्र नंदुरबार शहरात नगरपालिकेने केलेल्या नियोजनामुळे पाणी टंचाई जाणवली नाही. शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून शहराचा विकास साधला जात असल्याचे आमदार सुर्यवंशी यांनी सांगितले. नंदनगरीच्या जनतेसाठी मनोरंजनाचे आधुनिक दालन म्हणून या वॉटरपार्ककडे पाहिले जाते. इतर शहरांच्या मानाने या वॉटरपार्कचे दर अल्प राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत दिली माहिती
विधानपरिषदेचे उपाध्यक्ष तसेच कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत कामकाजाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती कॉग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘स्मार्ट सीटी’ चा लुक नंदुरबार शहरात पाहावयास मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटी उपक्रमासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस यावेळी त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, दिपक कटारीया, कुणाल वसावे उपस्थित होते.