संबंधितांना नोटीस बजाविण्याच्या प्रांत अधिकार्यांच्या सूचना : यात्रा नियोजनाची बैठक
देहूरोड । संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा अर्थात तुकाराम बीज येत्या 3 तारखेला देहूत होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा नियोजनाची बैठक अचानक घेण्यात आली. मात्र, बैठकीच्या सूचना अनेक विभागांना वेळेत न पोहचल्यामुळे अनेक विभागाचे शासकीय अधिकारी या बैठकीला गैरहजर होते. अनुपस्थित अधिकार्यांना नोटीस बजावण्याचे आदेश प्रांत अधिकार्यांनी दिले आहेत.
या अनुपम सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी संप्रदायासह भाविक देहूत दाखल होतात. यंदाच्या सोहळ्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी देहूत प्रांतअधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला विविध विभागाच्या अधिकार्यांनी दांडी मारली. तलाठी कार्यालयासह संबंधित कार्यलयाकडून वेळेत सूचना न मिळाल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या बैठकीस माध्यमांच्या प्रतिनिधींनाही कळविण्यात आले नव्हते. गीताजंली शिर्के, अ. की. जाधव, उषा चव्हाण, संतोष हगवणे, अर्जुन गुडसुरकर, सचिन मोरे, अनिता खरे, अरूण मोरे, अभिजीत मोरे आदी विभागांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.
धरणातून पाण्याचा विसर्ग
पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता धनजय जगधने यांनी इंद्रायणीच्या बंधार्याच्या दूरवस्थेची समस्या मांडली. यात्रा काळात नदीत धरणातून पाणी सोडण्यात येते. पण बंधार्यावर मोठ्याप्रमाणातील गळतीमुळे पाणी वाहून जाते. त्यामुळे भाविकांची ऐन यात्रेत गैरसोय होते, असे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत असल्यास यात्रा काळात अखंड पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यात्रेसाठी नदीत पाणी वेळेत पोहचावे या हेतूने दोन दिवसांपुर्वीच वडीवळे धरणातून नदीत पाणी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे एन. बी गदादे यांनी दिली. पुढील दोन दिवसांत हे पाणी देहूपर्यंत पोहचेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वीजपुरवठा राहणार अखंडीत
यात्राकाळात वीजपुरवठा अखंडीत सुरू ठेवण्यात येणार असून त्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर आहे. जादा कर्मचारी तैनात करण्यात येणार असून किरकोळ दुरुस्ती, उघड्या डीपींची सुरक्षा आदी कामे उरकून घेण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे देहुतील प्रभारी अभियंता अनिल हुलसुरकर यांनी दिली. आरोग्य विभागाच्यावतीने नेहमीप्रमाणे तात्पुरते बाह्यरुग्ण विभाग उभारण्यात येतील. गर्दीच्या ठिकाणी तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी अशी तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.
ध्वनीवर्धकांच्या आवाजावर निर्बंध
बारावीच्या परिक्षा सुरू असताना यावर्षी यात्रा आली आहे. त्यामुळे यात्रेत विविध पदार्थ विक्री करणारे तसेच विविध प्रकारच्या जाहिरातीसाठी वापरण्यात येणार्या ध्वनीवर्धकांच्या आवाजावर निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असून बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहनतळाच्या ठिकाणीच वाहने लावावी लागणार असून बाहेरगावहून येणार्या भाविकांची वाहने ऐनवेळी गावात सोडली जाणार नाहीत, अशा सूचना पोलिसांच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
पोलिसांची फौज तैनात
यावर्षी एक उपविभागीय पोलिस अधिकारी, 10 पोलिस निरीक्षक, 20 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, 120 पोलिस शिपाई, 50 महिला पोलिस, 30 वाहतूक पोलिस, गृरक्षकदलाचे (होमगार्ड) 50 जवान आणि 30 महिला तसेच विविध खासगी कंपन्यांचे सुरक्षारक्षक असा मोठा बंदोस्त ठेवण्यात येणार आहे.
भाविकांच्या निवासाची व्यवस्था
यात्रा काळात बाहेरगावहून येणार्या भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या 20 वर्गखोल्या, 9 आंगणवाडीच्या वर्गखोल्या आणि 16 विविध समाज धर्मशाळांमध्ये निवासाची व्यवस्था राहणार आहे. याशिवाय काही ठराविक दिंड्यांची ठराविक निवासाची ठिकाणे असून त्या ठिकाणी त्यांच्या राहुट्या उभारून निवासाची व्यवस्था केली जाते, अशी माहिती ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली.