बीडगाव शिवारात बनावट दुधाचा काळाबाजार उघड : 12 लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात

नाशिक आयजींच्या पथकासह गुन्हे शाखा व अडावद पोलिसांची कारवाई : अडावद पोलिसात गुन्हा दाखल

भुसावळ : चोपडा तालुक्यातील बीडगाव शिवारातील बीडगाव-कुंड्यापाणी रस्त्यावर बनावट दुधाचा काळाबाजार उघड करण्यात नाशिक आयजींच्या विशेष पथकासह जळगाव गुन्हे शाखा व अडावद पोलिसांना यश आले आहे. पथकाने टाकलेल्या छाप्यात 11 लाख 18 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाच आरोपींविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे तर दोन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

11 लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात
बीडगाव, ता.चोपडा शिवारातील बीडगाव-कुंड्यापाणी रोड लगत शेतात लक्ष्मण देवा भरवाड (पळासनेर, जि.धुळे) हा त्याच्या हस्तकामार्फत खाद्यतेल व दुध पावडरची मिश्रण करून भेसळीचे दुध विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व आयजींच्या विशेष पथकासह अडावद पोलिसांच्या पथकाने धाड टाकत तिघांच्या मुसक्या आवळल्या. पथकाने पिकअप एम.एच.18 बी.जे.6544 तसेच विना क्रमांकाची पिकअप, विना क्रमांकाची एक दुचाकी, चार मोबाईल, 56 दुधाचे कॅन, पाच तेलाने भरलेले डबे, 20 किलो अमूल दूध पावडर, इन्व्हर्टर, बॅटरी, तीन बादल्यांसह अन्य साहित्य मिळून 11 लाख 18 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच मुद्देमालाचे नमूने घेवून नाशवंत माल जागीच नष्ट करण्यात आला. चौघा आरोपींविरोधात अडावद पोलिसात एएसआय बशीर तडवी यांच्या फिर्यादीनुसार भादंवि 272, 273, 328, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीच चालायचा गोरखधंदा
मध्यरात्री भेसळ केलेले दुध तयार करण्यात आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एका गावातील डेअरी आणले जायचे व त्यानंतर तेथून ते ते दुध जळगावात आणले जात असल्याची माहिती आहे. मध्यरात्री होणार्‍या गुपचूप प्रकारामुळे दुध भेसळीचा गोरखधंदा गेल्या काही दिवसांपासून सुरूच होता मात्र अखेर त्यावर पर्दा हटवण्यात यंत्रणेला यश आले आहे.