बीड : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला सोमवारी हिंसक वळण आलेले दिसले. या बंदला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंददरम्यान दुपारी बारा वाजेपर्यंतच शहरात पाच ठिकाणी दगडफेक झाली. त्यामुळे बंदला गालबोट लागले.
विठ्ठल रामकिसन तिडके (रा. कुंडी ता. जवळकोट जि. लातूर) याने परहीतील एकाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून महापुरुषांबद्दल अर्वाच्च शब्दप्रयोग केले होते. त्याबाबतची व्हाईस क्लिप तीन दिवसांपासून सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय संघटना व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिडकेवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा बंदची हाक दिली होती. परळीत भाजपस इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. धारुर, शिरुर, गेवराई, माजलगाव, आष्टी, वडवणी, पाटोदा, अंबाजोगाई, केज येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला.
तिडकेला रविवारी लातूर पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले होते; परंतु तिडकेबद्दल जनमाणसांत प्रचंड रोष आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी सात वाजेपासूनच अनेक व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. काही व्यापार्यांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु तरुणांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. यावेळी काही संतप्त तरुणांनी दुकानांवर दगडफेक केली.
बशीरगंज, माळीवेस, सुभाष रोडवर दगडफेकीच्या घटना घडल्या. जिल्हा रुग्णालयासमोर बीड आगाराची बस (क्र. एमएच 20 बीएल- 9975) फोडण्यात आली. समोरील काच तुटून नुकसान झाले आहे. बंदला मिळालेले हिंसक वळण व त्यामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रॅलीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
दगडफेक करणार्या तीन दुचाकी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे रॅलीतील संतप्त तरुण शिवाजीनगर ठाण्यात गोळा झाले. यावळी पोलिसांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी देण्यात आली. त्यामुळे काळी वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.